कल्याण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढत्या जवळीकीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात असली तरी डोंबिवलीत मात्र या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील कलगीतुरा कायम असल्याचे चित्र दिसू लागले आहे. मनसेचे डोंबिवलीतील एकमेव आमदार राजू पाटील यांनी शुक्रवारी सकाळी एक ट्वीट करत ‘नशिबाने तुम्हाला हत्ती दिले, तुम्ही चप्पल चोरायच्या गोष्टी करू नका’ अशी जिव्हारी लागणारी टीका मुख्यमंत्री शिंदे यांच्या निकटवर्तीयांवर केली. डोंबिवलीच्या वेशीवर असलेल्या पलावा या उच्च शिक्षित वसाहतीमधील मालमत्ता कर कमी करण्याच्या मुद्दयावरून गेली काही दिवस खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे आणि आमदार पाटील यांच्यात स्पर्धा सुरू आहे. त्यातूनच आमदारांनी थेट मुख्यमंत्री पुत्रावर ट्वीट करत हल्ला चढविल्याची चर्चा आता रंगली आहे.
कल्याण लोकसभा क्षेत्र आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मोठी वसाहत म्हणून पलावा वसाहतीकडे पाहिले जाते. येथील मालमत्ता कर कमी करण्यासाठी मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न करत आहेत. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे पाटील आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात विस्तवही जात नाही. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्याचे पहायला मिळाले. या दोन नेत्यांमधील वाढता संवाद लक्षात घेता डोंबिवलीतही शिंदे-पाटील एकत्र दिसतील अशी आशा बाळगली जात होती. गुढीपाडव्यानिमित्त खुद्द मुख्यमंत्र्यांनी मनसे कार्यालयाला भेट दिल्याने आमदार पाटील सुखावले. असे असले तरी पलावा वसाहतीच्या मालमत्ता कराच्या मुद्दयावरून पुन्हा एकदा आमदार पाटील यांनी टोलेबाजी करत थेट मुख्यमंत्री पुत्रावरच निशाणा साधल्याचे पहायाल मिळत आहे.