जीईएम हे राष्ट्रहिताचे डिजिटल साधन: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल

Spread the love

मुंबई-आर्थिक वर्ष 2022-2023 मधे सरकारी पोर्टल, गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस वरून वस्तू आणि सेवांच्या खरेदीने 2 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ही एक उल्लेखनीय कामगिरी असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईत जीईएमच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सार्वजनिक आणि राष्ट्रीय हितासाठी डिजिटल साधन म्हणून जीईएमची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे देशाला ज्या गतीने पुढे नेले आहे त्याचे जीईएम हे प्रतीक आहे, असे गोयल म्हणाले.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री  पीयूष गोयल यांनी जीईएम आणि त्याच्या खरेदीदार तसेच विक्रेत्यांच्या मजबूत परिसंस्थेचे अभिनंदन केले. त्याच्या अतुलनीय पाठबळामुळेच ही ऐतिहासिक कामगिरी साध्य करता आली आहे. देशाच्या दुर्गम भागाच्या कानाकोपऱ्यातील लोकांच्या सहभागासह सचोटी आणि उच्च दर्जाच्या पारदर्शकतेने सरकारी विभाग चालावेत. सरकारी खरेदीच्या पद्धतीने, महिला उद्योजक, स्टार्टअप आणि एमएसएमई क्षेत्राला न्याय्य पद्धतीने सहभागी होण्यास त्यांनी सक्षम बनवावे अशी पंतप्रधानांची इच्छा असल्याचे गोयल यांनी सांगितले.

“मला विश्वास आहे की जीईएम वेगाने वाढेल, याचे भविष्य खूप उज्ज्वल आहे. मी अधिकाधिक विक्रेत्यांना जीईएम मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करू इच्छितो जेणेकरुन त्यांनाही सरकारी खरेदी प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

जीईएम पोर्टलची सुरुवात 2017 मध्ये झाली. पहिल्या वर्षी यावर सुमारे 400 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. दुसऱ्या वर्षी जीईएम ने सुमारे 5800 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. दोन वर्षांपूर्वी तो सुमारे 35000 कोटी रुपयांपर्यंत  वाढला. तर गेल्या वर्षी तिपटीने वाढून 1 लाख 6 हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे.  5 वर्षात 2 लाख कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय वाढल्याने पंतप्रधानांचा हा प्रयोग यशस्वी झाल्याचे दिसून येते, असेही गोयल यांनी सांगितले.

भारताने 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 750 अब्ज (बिलियन) डॉलर निर्यातीचा टप्पा ओलांडला आहे आणि अंतिम आकडा 765 अब्ज (बिलियन) डॉलर्सच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे असेही त्यांनी नमूद केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page