नवीदिल्ली- टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावर कोण असेल? यावरचा पडदा आता दूर झाला आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर असेल याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नावाची चर्चा होती. आता त्याच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे.
श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा कार्यकाळ हा साडे तीन वर्षांचा असणार आहे. वनडे वर्ल्डकप 2027 पर्यंत हा कार्यकाळ सांभाळावा लागणार आहे. यात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, टेस्ट चॅम्पियनशिप 2025, टी20 वर्ल्डकप, आशिया कप आणि वनडे वर्ल्डकपचा समावेश आहे. त्यामुळे यापैकी कोणत्या चषकावर टीम इंडिया नाव कोरणार याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना आतापासूनच लागली आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितलं की, मला अत्यंत आनंद होत आहे की गौतम गंभीर याची भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याचं घोषित करतो. आधुनिक काळातील क्रिकेट झपाट्याने विकसित झाले आहे आणि गौतमने या बदलत्या लँडस्केपचा जवळून साक्षीदार आहे. त्याने संपूर्ण कारकिर्दीत विविध भूमिकांमध्ये दमछाक सहन करून आणि उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की गौतम भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी योग्य व्यक्ती आहे. टीम इंडियासाठी त्याची स्पष्ट दृष्टी, त्याच्या अफाट अनुभवाची सर्वाधिक मागणी होती. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी उत्तम न्याय देईल. बीसीसीआय त्याच्या या नवीन प्रवासाला सुरुवात करताना त्याला पूर्ण पाठिंबा देत आहे.