रत्नागिरी : रत्नागिरीतील डीमार्ट समोरील मुख्य
रस्त्यावर सीएनजी टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायूगळती होऊन झालेल्या मोठ्या आवाजाने घबराट पसरली. घटनेनंतर एमआयडीसी आणि नगर परिषद अग्निशमन पथकांनी तातडीने धाव घेतल्याने वायूगळतीवर नियंत्रण मिळवित मोठा अनर्थ टाळला. या दुर्घटनेमुळे तासभरापेक्षा जास्त काळ मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
कुवारबावकडून रत्नागिरीकडे मुख्य रस्त्यावरून गॅस टँकर रत्नागिरीच्या दिशेने येत होता. शनिवारी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा टँकर डी मार्ट समोरील ठिकाणी येता त्यातून मोठय़ा प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. दोन व्हॉल्व्हमधून ही गॅस गळती सुरू होती.इतर वाहनधारकांची देखील यामुळे पळापळ झाली. टँकरमधील गॅस वेगाने बाहेर पडत होता.
या गॅस गळतीवर नियंत्रण राखण्यासाठी व अनर्थ टाळण्यासाठी लगोलग अग्निशमन पथकांना पाचारण करण्यात आले. पोलीस यंत्रणाही दाखल झाली. यामुळे मार्गावर मोठी वाहतूकी कोंडी झाली. टँकरमधून गळती होणारा गॅस थांबविण्यासाठी तत्काळ प्रयत्न हाती घेण्यात येऊन त्या गळतीवर नियंत्रण मिळवण्यात आले.