मुंबई- मुंबईतील चाकरमानी गणपती आणि शिमगोत्सव या दोन महत्त्वाच्या सणांना कोकणची वाट धरतात. त्यामुळे या सणासुदीच्या काळात महत्त्वाच्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल असते. रेल्वेचे आरक्षण ४ महिने आधीच सुरू होते. यंदाही गणेशोत्सवाच्या आरक्षणाला ४ महिने आधीच सुरूवात होणार आहे.
कोकण (Kokan) रेल्वेचे आरक्षण होणार सुरू
गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे (Kokan) तिकिटाचे आरक्षण १७ मेपासून सुरू होणार आहे. यावर्षी १९ सप्टेंबरला श्री गणेश चतुर्थी आहे. या दिवसापासून साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी येणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे यंदा रेल्वे तिकिटाचे बुकिंग १७ मेपासून सुरू होणार आहे. १७ मे पासूनच सर्व चाकरमानी वर्ग आरक्षण करण्यास सुरूवात करेल. यामुळे सर्व महत्त्वाच्या गाड्या २ ते ३ दिवसात पूर्ण आरक्षित होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कोकणात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो. घरोघरी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होते. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. दीड, पाच, सात, नऊ किंवा अकरा दिवसांमध्ये साजरा होणाऱ्या या गणेशोत्सवासाठी प्रत्येक घरामध्ये मुंबई, पुणे येथून चाकरमानी येत असतात. त्यामुळे त्यांना प्रवासाचे नियोजन आगाऊ करावे लागते. यंदा १९ सप्टेंबरला श्री गणेश चतुर्थी असली तरी पूर्वतयारीसाठी अनेकजण गावाकडे येणार आहेत. यासाठी रेल्वेचे बुकिंगचे आतापासूनच नियोजन केले जात आहे. केवळ रेल्वेचं नाहीतर या काळात बसगाड्या, खासगी वाहने सुद्धा आरक्षित असतात.