
खेड: खेड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलासोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी फरारी असलेला मनोज शिर्के (वय ३५, रा. संगलट-बौद्धवाडी) याला खेड पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा अटक केली.
१८ मे रोजी रात्री एका गावात सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून संशयित मनोज शिर्के याने एका अल्पवयीन मुलासोबत अश्लील वर्तन केले होते. पीडित मुलाने ही बाब आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर, त्यांनी पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात तक्रार दाखल केली होती.
गेल्या तीन दिवसांपासून मनोज शिर्के फरारी होता. तो एका ठिकाणी असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले यांनी पथकासह सापळा रचला. या सापळ्यात फरारी संशयित अलगद अडकला. याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक येवले करत आहेत.