चिपळूण : चिपळूणमध्ये मराठा भवन उभारण्यासाठी भरीव आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा चिपळूण तालुका, मराठा महाकुटुंब तसेच मराठा शिवजयंती महोत्सव समितीतर्फे चिपळूण दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे दिले. या निवेदनावर ना. पवार यांनी मराठा भवनासाठी भरीव निधी दिला जाईल, अशी ग्वाही दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेनिमित्त चिपळूण दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी आपली सभा आटोपून हॉटेल अतिथी येथे आले. तेव्हा हॉटेल अतिथीचे संस्थापक तथा प्रसिद्ध उद्योजक प्रकाश देशमुख यांनी ना. पवार यांचे स्वागत केले. यावेळी ना. पवार यांना मराठा समाजाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली, तर दादांनी देखील तितक्याच तत्परतेने माहिती जाणून घेतली आणि निवेदन स्वीकारले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सौ. रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे आदी उपस्थित होते.
या निवेदनानुसार चिपळूण शहर हे कोकणातील अत्यंत मध्यवर्ती व प्रगत शहर आहे. या शहरात गेल्या जवळपास पंधरा वर्षांमध्ये मराठा संघटनांनी मराठा समाजासाठी मोठे आंदोलन उभे केले आहे, लढा दिला आहे. तसेच मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावाही केलेला आहे. चिपळूण हे मराठा समाजातील चळवळीसाठी कोकणातील केंद्रबिंदू असणारे शहर आहे. आपल्या मराठा समाजाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे तसेच रोजगारसाठीच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, याशिवाय मराठा भगिनींना घरगुती व्यवसायचे मार्गदर्शन करणे, अशा प्रकारचे छोटे मोठे उपक्रम आम्ही नेहमीच आयोजित करत असतो.
मराठा समाज हा नेहमीच या उपक्रमाला व कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद देत आहे. मात्र, गेल्या काही वर्षातील एक मोठी बाब निदर्शनास आली आहे की, आपल्या मराठा समाजाला एकत्रित येण्यासाठी किंवा एखादा कार्यक्रम व उपक्रम आयोजित करण्यासाठी पुरेशी जागा शहरामध्ये नाही. त्यामुळे बराच अडचर्णीना सामोरे जावे लागत आहे. याकरिता गेले काही वर्ष आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. आमच्या प्रयत्नातून आम्ही शहरानजीक बायपास रोड भागामध्ये सुमारे तीन ते चार एकरचा प्लॉट विकत घेण्याचा निर्णय केला आहे व या ठिकाणी मराठा समाज भवन उभारण्याचाही आम्ही निश्चय केलेला आहे. यादृष्टीने आमची तयारी ही सुरु आहे. या मराठा समाजभवनामध्ये मल्टीपर्पज हॉल, लायब्ररी, मराठा समाजाचे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जागा तसेच संग्रहालय व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मराठा समाज भवननात महाराष्ट्रातून येणाऱ्या आपल्या मराठा बांधवासाठी निवास व्यवस्थाही करणार आहोत.
या समाजभावनासाठी सुमारे दहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यातील जागा खरेदीसाठी सुमारे दोन कोटीचा खर्च येणार आहे. आपण महाराष्ट्रातील मराठा समाजाचे एक विश्वासक व आणि कणखर नेतृत्व आहात. दादा, आपण महाराष्ट्रातल्या राजकारणातला मराठा समाजाचा मुख्य चेहरा आहात व आम्हाला आपल्या कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा सार्थ अभिमान आहे. त्यामुळे आम्ही हक्काने आपल्याकडे आमच्या या प्रस्तावित मराठा समाज भवनासाठी आपल्याकडे भरीव आर्थिक मदतीचे आवाहन करत आहोत. कोकणातील एक भव्य अशी मराठा समाजाची वास्तू उभी करण्याचे आमचे स्वप्न आहे. हे स्वप्न केवळ आपल्या सहकार्यातून पूर्णत्वास जाईल. याची आम्हाला पूर्ण खात्री आणि विश्वास आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी संतोष सावंतदेसाई, तानाजी इलके, प्रसाद शिर्के, सिद्धांत देशमुख, अभिनव देशमुख, शैलेश मोरे , संजय घाडगे, संतोष काळे, सौ.मालती पवार, सौ.निर्मला जाधव, सौ.आशाताई गायकवाड, सौ.स्मिता खंदारे, सौ.रश्मी मोरे, सौ. संध्या घाडगे, सौ. प्राजक्ता सरफरे, सौ. पुर्वा आयरे आदी उपस्थित होते.