पाणी जपून वापरण्याचे देवरूख नगरपंचायतीचे नागरिकांना आवाहन.
जनशक्तीचा दबाव न्यूज | देवरुख | एप्रिल १४, २०२३.
देवरूख शहरात दि. १८ एप्रिलपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार असून नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन देवरूख नगरपंचायतीमार्फत करण्यात येत आहे.
भारतीय हवामान खात्याने दक्षिण पॅसिपिक महासागरातील ‘अल निनो’ या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे देशातील पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली आहे. परिणामी उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा येण्याची संभावना असून तीव्र उष्णतेमुळे होणारे बाष्पीभवन विचारात घेता बंधाऱ्यातील पाणीसाठा दिवसेंदिवस वेगाने खालावत जाणार आहे. एकंदर अपुरे पर्जन्यमान व विलंबाने मान्सुनचे आगमन होण्याची संभाव्यता आहे.
तसेच अल निनो प्रभावाच्या धर्तीवर माहे ऑगस्ट २०२३ पर्यंत पुरेल अशा प्रकारे पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन तथा उपाययोजना करण्याच्या सुचना शासनस्तरावरून प्राप्त झालेल्या आहेत. देवरूख शहरास पर्शरामवाडी व धावडेवाडी बंधारा या जलस्त्रोतांमधून पाणीपुरवठा होत आहे. अल-निनोच्या प्रभावाने वाढत्या तापमानामुळे पर्शरामवाडी व धावडेवाडी बंधाऱ्यातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. सद्यस्थितीत बंधाऱ्यात केवळ ३० मे पर्यंत पुरेल इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सूनचे आगमन विलंबाने झाल्यास व त्यामुळे उपरोक्त पाणीसाठा संपुष्टात आल्यास दुसरा कोणताही जलस्त्रोत तथा पर्याय उपलब्ध नसल्याने शहरात भीषण पाणीटंचाई उद्भवू शकते.
हे गंभीर परिणाम लक्षात घेत बंधाऱ्यातील उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने व जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. जेणेकरून पाणीटंचाईची संभाव्य झळ नागरीकांना पोहचू नये. आगामी काळातील संभाव्य भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मान्सूनच्या आगमनापर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने मंगळवार दिनांक १८ एप्रिल २०२३ पासून शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येईल. परिस्थिती अजून बिकट झाल्यास सदर पाणीपुरवठा दोन दिवसांआड करण्याची तयारी असणार आहे. तरी नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून नगरपंचायतीस सहकार्य करावे.