*विधानसभा निवडणुकीची नांदी लागलेली असताना राजकीय पक्षांमध्ये जागा वाटपावरून आतापासूनच संघर्ष पेटायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळतंय.*
*चिपळूण-* विधानसभा निवडणुकीची नांदी लागलेली असताना राजकीय पक्षांमध्ये जागा वाटपावरून आतापासूनच संघर्ष पेटायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळतंय. कोकणात चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघावरून महायुतीतील तीनही पक्ष आपसात लढू लागल्याने नवा राजकीय पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार शेखर निकम हे या मतदार संघातून आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी सर्वांत आधी या जागेवर दावा ठोकला. अशातच मागील आठवड्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून शिंदे गटात सामील झालेले माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी निर्धार मेळावा घेत चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून लढण्याची तयारी दर्शवलीये. महायुती मधील दोन महत्त्वाचे पक्ष आपसात दावे प्रति दावे करत असतानाच आता भाजपने देखील यामध्ये थेट उडी घेतलीये.
चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील उमेदवार संगमेश्वर मधीलच पाहिजे, भाजपच्या स्थानिक नेत्याची मागणी
संगमेश्वर मधील भाजपचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष असलेले प्रमोद अधटराव यांनी तर चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील उमेदवार संगमेश्वर मधीलच पाहिजे अशी मागणी करत भाजप देखील इथून लढण्यास इच्छुक असल्याचे म्हटले आहे. महायुती मधील या घरोब्यात जागा वाटपावरून निर्माण झाल्यामुळे कोकणातील राजकीय वातावरणात कंदाल झाल्याचे चित्र सध्याच्या स्थितीवरून निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. या सगळ्या घडामोडीनंतर चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात राजकीय हालचालींना नव्याने वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असलेली सीट खेचून आणण्यात शिवसेनेला आणि भाजपला कितपत यश मिळतं हे पाहणे पुढील काळात महत्त्वाचे ठरणार आहे.
विद्यमान आमदार शेखर निकम आणि माजी आमदार सदानंद चव्हाण हे दोघेही पारंपारिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. 2019 मध्ये शेखर निकम यांच्याकडून झालेला पराभव सदानंद चव्हाण यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे पराभवाची परतफेड करण्यासाठी सदानंद चव्हाण यांनी जाहीर मेळावा घेत निर्धार केला आहे. महायुती मधील या संघर्षाचा नेमका फायदा कोणाला होणार आणि नुकसान कोणाचे होणार याकडे देखील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
*2019 मध्ये मतदार संघात काय झाले?…*
सध्या अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या शेखर निकम यांच्या राजकीय वर्चस्वाबाबत बोललं जातं. तसं म्हटलं तर चिपळूण – संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची विशेषत: ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद नाकारून चालणार नाही. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम यांना 1 लाख 1 हजार 578 मतं मिळाली होती. त्यांनी शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांचा पराभव केला होता. चव्हाण यांना 71 हजार 654 मतं मिळाली होती. 2 लाख 69 हजार 322 मतदारांपैकी 1 लाख 75 हजार 624 मतदारांनी म्हणजे 66.1 टक्के इतकं मतदान या विधानसभा मतदार संघात झाले. पैकी 57.8 टक्के मतं निकम यांना तर 40.8 टक्के मतं ही चव्हाण यांना मिळाली. पण, सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर चिपळूण – संगमेश्वर या मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांनी दावा केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे. मुख्यबाब म्हणजे जागा कुणाला मिळणार? हे पाहावं लागणार आहे.