
मंगळुरू : भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास राज्यात दंगली होतील, असे अमित शहा यांनी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यानच्या वक्तव्यात म्हटले होते. यावर कॉंग्रेसने आक्षेप घेत शहा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
कर्नाटकातील बेळगाव येथे मंगळवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले होते की, ‘कॉंग्रेसचे सरकार आल्यास राज्याचा विकास ‘रिव्हर्स गियर’मध्ये होईल. घराणेशाहीचे राजकारण शिगेला पोहोचेल आणि ‘काँग्रेस सत्तेवर आल्यास दंगली होतील’, असे म्हटले होते. या प्रकरणी कॉंग्रेस नेते आणि कर्नाटक निवडणूक प्रभारी रणदीप सुरजेवाला आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी ग्राउंड्स पोलीस स्टेशन येथे भडकाऊ भाषण करणे, लोकांमध्ये तेढ पसरवणे आणि विरोधकांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित शाह म्हणाले होते की, “काँग्रेसचे सरकार आल्यास कर्नाटकचे भवितव्य रिव्हर्स गियरने पाठिमागे जाईल. चुकूनही काँग्रेस आली तर आजवरचा सर्वात मोठा भ्रष्टाचार, तुष्टीकरण, परिवारवाद निर्माण होईळ. तसेच संपूर्ण कर्नाटकमध्ये दंगली उसळतील. ही पिढी परिवर्तनाची निवडणूक आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा एकदा सरकार स्थापन कर” असंही शाह म्हणाले होते.

कॉंग्रेस नेते डीके शिवकुमार म्हणाले की, ‘केंद्रीय गृहमंत्री म्हणतात की कॉंग्रेस सत्तेवर आली तर जातीय दंगली होतील. ते असे कसे म्हणू शकतात? याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे.
