दहा हजारात घरकूल व १७०० रूपयात शिलाई मशिन ; बचत गटातील महिलांची फसवणूक
चिपळूण :- दहा हजार रूपयात घरकूल व १७०० रूपयात शिलाई मशिन देतो असे सांगून येथील बचत गटाच्या शंभरहून अधिक महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे . याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांनी महिलांसह पोलिस स्थानकात जाऊन याबाबत चौकशी व कारवाईची मागणी केली.
शहर व परिसरातील बचत गटातील महिलांची डिसेंबर महिन्यात उषा अशोक पवार, सरिता संजय पवार, दिक्षा दिपक माने व पूजा धिरज नलावडे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बैठक घेतली. महाराष्ट्र क्रांतीसेना संस्थेच्या अंतर्गत शासनाच्या योजनेतून शिलाई मशीन व ज्यांना निवारा नाही, अशांना घरकूल योजनेचा लाभ मिळवून देण्याचे अमिष दाखवले. घरकुलासाठी दहा हजार रूपये तर शिलाई मशिनसाठी १७०० रूपये भरावे लागतील असे सांगितले. त्यानुसार बचत गटातील महिलांनी त्या अमिषाला बळी पडत पैसे जमा केले.
याबाबत काही महिलांनी घरकूलाविषयी वारंवार विचारणा केल्यानंतर त्यांना दमदाटी करण्यात आली. परंतू अद्याप एकाही महिलेला घरकुलाचा लाभ मिळाला नसल्याने फसवणूक झाली असल्याचे महिलांनी पोलिसांना सांगितले.