रत्नागिरी- बिबटयाची नखे विकण्यासाठी खेडमधील भरणे येथे आलेल्या तिघांना वनविभागाच्या पथकाने सापळा रचून दि. ५ रोजी रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दि. ६ रोजी संगमेश्वर तालुक्यातून आणखी एकाला वनविभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील मौजे भरणे येथे मुंबई-गोवा महामार्गावर जाधववाडी या ठिकाणी बिबट्याची नखे विक्रीसाठी काहीजण रिक्षामधून येणार आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर वनविभागच्या पथकाने सापळा रचला होता. दि. ५ रोजी पूर्वनियोजित पद्धतीने दिलीप कडलग (४८. रा. घाटकोपर, मुंबई), अतुल दांडेकर (३६, रा. चेंबुर, मुंबई) व विनोद कदम (४२, रा. सावर्ड ता. चिपळूण जि. रत्नागिरी) हे रिक्षा (एम एच ०३ बी ए ९७१२) मधून भरणे परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना थांबवून त्यांची झडती घेतली असता, दिलीप कडलग याच्याकडून बिबट्याची एकूण ४ नखे हस्तगत करण्यात आली. वनविभागाच्या पथकाने त्यांच्या ताब्यातील रिक्षा जप्त केली. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता संशयित अतुल दांडेकर याने दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दि. ६ रोजी संगमेश्वरमधील मौजे साखरपा येथे सापळा रचून या प्रकरणात सहभागी असलेल्या चौथ्या संशयित सचिन रमेश गुरव (रा. गोविळ ता. लांजा जि. रत्नागिरी) याला बिबट्याच्या आणखी ४ नखे व हिरो कंपनीची मायस्ट्रो स्कुटी दुचाकीसह (एम एच ०८ ए एम ३९९८) ताब्यात घेणेत आले. ही कारवाई कोल्हापूरचे मुख्य वनरक्षक आर. एम. रामानुजम, यांचे मार्गदर्शनाखाली विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण), गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) वैभव बोराटे, परिक्षेत्र वन अधिकारी दापोली प्रकाश पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली.