
दोडामार्ग : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोची जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर शिवभक्तांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे. त्याच पार्श्वभूमीवर येथील पिंपळेश्वर चौकात शिवप्रेमींनी फटाके फोडून, घोषणांनी परिसर दणाणून, जल्लोषात आनंद साजरा केला.
युनेस्कोने महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील 1 अशा एकूण 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे. या यादीत सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांचा समावेश आहे. याचा आनंद संपूर्ण दोडामार्ग तालुक्यामध्ये जल्लोषात करण्यात आला. पिंपळेश्वर चौकात शिवप्रेमींनी फटाके फोडले, गुलाल उधळला आणि जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा गर्जना करत महाराजांप्रति आदर व्यक्त केला.

अखिल भारतीय मराठा महासंघ दोडामार्ग तालुकाध्यक्ष उदय पास्ते, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सोनू गवस, वैभव इनामदार व अन्य मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी युनेस्कोच्या या निर्णयाचे स्वागत करत हा आमच्यासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे असे सांगितले. सिंधुदुर्ग व विजयदुर्ग यासारख्या शिवकालीन किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास आता संपूर्ण जगासमोर उभा राहील. ही गोष्ट आमच्या इतिहासप्रेमाची, स्वाभिमानाची आणि मराठा परंपरेच्या वैभवाची साक्ष आहे.
युनेस्कोच्या या मान्यतेमुळे केवळ ऐतिहासिक स्थळांचा गौरव झालेला नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय युद्ध कौशल्याची आणि स्थापत्यशास्त्राची जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. शिवप्रेमींसाठी हा खरोखरच सोन्याचा दिवस ठरला आहे, असे मत उपस्थित शिवप्रेमींनी व्यक्त केले.
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
