जनशक्तीचा दबाव न्यूज | दुबई | फेब्रुवारी ०५, २०२३.
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे दुबईत निधन झाले आहे. पाकिस्तानच्या मीडियाच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. परवेज मुशर्रफ प्रदीर्घ काळ आजारपणामुळे त्रस्त होते. त्यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, आज त्यांची प्रकृती जास्तच खालावल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे. २०१६ पासून त्यांच्यावर दुबईमध्ये उपचार सुरु होते.
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांचा जन्म ११ ऑगस्ट १९४३ रोजी नवी दिल्लीतील दर्यागंज भागात झाला होता. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीच्या काही दिवस आधी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वडील पाकिस्तान सरकारमध्ये काम करत होते. यानंतर त्यांच्या वडिलांची पाकिस्तानातून तुर्कीला बदली झाली. १९४९ मध्ये ते तुर्कीला गेले. काही काळ ते आपल्या कुटुंबासह तुर्कीमध्ये राहत होते. त्यांनी तुर्की भाषा देखील शिकली. मुशर्रफ हे तरुणपणी खेळाडू होते. १९५७ मध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब पुन्हा पाकिस्तानात परतले. त्यांचे शालेय शिक्षण कराचीच्या सेंट पॅट्रिक स्कूलमध्ये झाले आणि कॉलेजचे शिक्षण लाहोरच्या फोरमन ख्रिश्चन कॉलेजमध्ये झाले होते.
कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानची आगळीक जनरल मुशर्रफ यांच्याकडून करण्यात आली होती. माजी निवृत्त जनरल परवेज मुशर्रफ यांनी लष्करप्रमुख असताना बंड करून पाकिस्तानची सत्ता मिळवली. मुशर्रफ यांनी संविधान भंग करुन ३ नोव्हेंबर २००७ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर डिसेंबर २०१३ मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता.
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी राष्ट्राध्यक्षांना अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठानं फाशीची शिक्षा सुनावली होती.
दरम्यान, पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा लाहोर उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय दिला होता. देशद्रोहाच्या आरोपात इस्लामाबादच्या विशेष न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली होती. विशेष न्यायालयाने दिलेला निर्णय असंवैधानिक असल्याचं लाहोर उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. मुशर्रफ यांनी त्यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला लाहोर उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं.
परवेज मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुशर्रफ यांच्यावर डिसेंबर २०१३ मध्ये ३ नोव्हेंबर २००७ रोजी देशात आणीबाणी लागू केल्याबद्दल आणि डिसेंबर २००७ च्या मध्यापर्यंत राज्यघटना निलंबित केल्याचा आरोप होता. याप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३१ मार्च २०१४ रोजी मुशर्रफ यांना दोषी ठरवण्यात आले होते. मुशर्रफ यांनी १९९ ते २००८ या कालावधीत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख म्हणून कारभार सांभाळला. मुशर्रफ मार्च २०१६ पासून दुबईत राहत होते. बऱ्याच काळापासून त्यांच्यावर दुबईत उपचार सुरू होते.
परवेज मुशर्रफ यांनी ऑक्टोबर १९९९ मध्ये लष्करी बंड करून पाकिस्तानची सत्ता काबीज केली होती. मुशर्रफ २००१ ते २००८ पर्यंत पाकिस्तानचे राष्ट्राध्य होते. परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तान संविधान भंग करत नवाज शरीफ यांचं सरकार उलथवून सत्ता काबीज केली होती. पाकिस्तानच्या इतिहासातील हे पहिलं प्रकरण आहे, ज्यात एखाद्या माजी लष्कर प्रमुखावर देशद्रोहाच्या आरोपात नागरी कोर्टात खटला चालवण्यात आला.