धुळे:- धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील नदीकाठच्या गावांच्या शेतकऱ्यांनी गेल्या दीड महिन्यापासून धुळे जिल्हाधिकाऱ्यांना नदीपात्रात पाणी सोडावे अशी मागणी केली होती. मात्र जिल्हा प्रशासन व जिल्हाधिकारी जलज शर्मा गांभीर्याने घेत नसल्याने आज शेतकऱ्यांसह पाणी सोडण्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी जिल्हाधिकारी साहेब तुमच्या पाया पडतो पण पाणी सोडा अशी विनंतीकरून जिल्हाधिकाऱ्यांचे पाय धरले यावेळी माजी आमदार शरद पाटलांसह शेतकरी व नदीकाठावरील गावांचे सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धुळे जिल्ह्यात अत्यंत उष्णतेचे वातावरण असून अनेक गावांना पाणीटंचाई भासत आहे. अनेक ठिकाणी उन्हाळी पिकांना पाण्याची गरज असून जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे दरवर्षाप्रमाणे मे महिन्यात अक्कलपाडा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येते. मात्र यावर्षी मे महिना संपायला आला तरी देखील धरणातून नदीपात्रात पाणी सोडले नसल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. म्हणून धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण बाबी गांभीर्याने घेऊन दोन दिवसाच्या आत धरणातून पाणी सोडण्याच्या सूचना द्याव्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी दिला आहे.
धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा हे भाजपमय झाले असल्याचा घनघाती आरोप देखील माजी आमदार शरद पाटील यांनी केला आहे. धुळे जिल्ह्यातील ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्या ठिकाणी धरणांचे पाणी सोडले गेले, मात्र ज्या ठिकाणी राज्य सरकारच्या विरोधातील लोकप्रतिनिधी आहेत अशा ठिकाणी जाणून बुजून दुष्काळाचे कारण दाखवून पाणी सोडले जात नसल्याचा घनाघाती आरोप माजी आमदार शरद पाटील यांनी यावेळी केला आहे.