भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी यांनी घेतली श्रीमती महाजन यांची सदिच्छा भेट.
रत्नागिरी | फेब्रुवारी २८, २०२४.
आज रत्नागिरी येथी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात भारताच्या माजी लोकसभा अध्यक्षा, ज्येष्ठ भाजपा नेत्या श्रीम. सुमित्रा महाजन यांनी रत्नागिरीकरांशी संवाद साधला. यावेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पा पटवर्धन, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी उपस्थित होत्या.
एक स्त्री संसारात आणि सामाजिक क्षेत्रात समन्वय साधून राष्ट्रउभारणीच्या कार्यात आपले योगदान कशाप्रकारे देऊ शकते याबाबत सुमित्रा महाजन यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, “माझा आग्रह आहे, आजच्या स्त्रीने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून चतुरांगिणी व्हावे. स्त्रीचा स्वाभिमान हाच मोठा दागिना असायला हवा. यासाठी समाजाभिमुख सेवाकार्यात जमेल तितके काम करण्यास सुरुवात केली की आवड वाढते; आवड वाढली की सवड मिळते. घर, परिवार आणि समाज समृद्ध करण्याची जबाबदारी आपली आहे याची जाणीव प्रत्येकीला झाली पाहिजे.
याशिवाय आपल्या अनुभवी, ओजस्वी वाणीने सामाजिक, राजकिय विषयांबरोबरच शैक्षणिक क्षेत्रावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, “उत्तम शिक्षक हा सुसंस्कृत समाजनिर्मितीचा एक महत्वाचा स्तंभ आहे. केवळ पुस्तकी ज्ञान देऊन आजची पिढी स्थिरस्थावर होणार नाही. योग्य-अयोग्य, चूक-बरोबर, चांगल्या-वाईट गोष्टींची बदलेली परिमाणे विद्यार्थीदशेत समजली पाहिजेत. अन्यथा त्यांना राजकारणाबाबत तिरस्कार वाटू लागेल आणि ही गोष्ट राष्ट्रउभारणीच्या कार्यातील सर्वांत मोठा अडथला ठरेल. मुळात छत्रपती शिवरायांचे चरित्र, महाराणा प्रतापांचे चरित्र विद्यार्थ्यांना ऐतिहासिक गोष्टींच्या स्वरुपात शिकवण्याऐवजी राजकीय संदर्भ देऊन शिकवले तर विद्यार्थी जाणते होतील.”
“आज महिलांना शक्ती वंदन कायद्याने ३३% आरक्षण दिले आहे. महिलांनी आता जबाबदार व्हायला हवे. काहींनी शिवबा घडवा, काहींनी लक्ष्मीबाई. काहींनी स्वतःचा विकास करा आणि त्याचा समाजाला लाभ द्या.” असेही त्या म्हणाल्या. “पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी असामान्य कार्यकर्ता होते. त्यांनी नेता होण्यासाठी केलेले प्रयत्न भिंग घेऊन शोधले तरी सापडतील की नाही याबाबत माझ्या मनात शंका आहे. आपल्यासारखे सेवाभावी कार्यकर्ते घडवण्याचा त्यांचा ध्यास कधी त्यांच्यातील नेतृत्त्वगुणांचा विकास करून गेला हे त्यांच्यासोबत असणाऱ्यांनाही कळले नसेल. ठरलेल्या अजेंड्याप्रमाणे कार्यक्रम संपन्न करणे, त्यासाठी पराकोटीचा वक्तशीरपणा, प्रत्येक समस्येचा, संदर्भाचा बारीक बारीक दुव्यांचा अभ्यास करण्याची सवय आणि आकलनशक्ती तर अगाधच. दैवी वक्तृत्त्व, संयम आणि शांत स्वभाव या गोष्टींवर त्यांचे असलेले प्रभुत्त्व त्यांच्या व्यक्तित्वाची भुरळ समाजावर पडत गेली. आणि मग माझ्यासारखे, तुमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले. एवढच सांगायचं आहे, मोदी होणं सोप्पं अजिबात नाही, पण स्वतः मोदीजीच म्हणतात, महिलांच्या निर्धाराला तोड नाही.” त्यांच्या या प्रेरणादायी उत्तरावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिष्ठित रत्नागिरीकर आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.