
राजापूर : राजापूर शहरातील मुख्य रस्त्याचे काम झाले तेव्हा राज्यात महायुती सत्ता होती आणि या कामा ठेकेदार तुमच्या महायुतीतील एका घटक पक्षाचा पदाधिकारी होता. त्यामुळे मोहन घुमे यांनी आधी परिपूर्ण माहिती घेवून नंतर आरोप करावेत. राहिला प्रश्न निवडणुकिचा, तर माझ्या नगराध्यक्ष पदाच्या काळात शहराच्या विकासासाठी मी कोट्यवधीचा निधी आणला आहे. मात्र शहरासाठी एकही रूपया निधी न आणनाऱ्या आणि मतदारांनी अनेक वेळा धुळ चारलेल्या घुमे यांना आता निवडणुकीची दिवा स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी ते असे बालीश आरोप करत असल्याची खरमरीत टिका माजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी केली आहे.*
मुख्य रस्त्याच्या कामासाठी माजी आमदार सौ.हुस्नबानू खलिफे यांनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांया माध्यमातून 1 कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. त्यानंतर 2023 मध्ये राज्यात भाजपा, शिवसेना शिंदेगट अशी महायुती सत्ता असताना तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी रस्त्याच्या कामासाठी लागणार 60 लाखांचा उर्वरित निधी मंजूर केला होता. त्यानंतर महायुतीतील एका घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांने या कामा ठेका घेतला होता. काम सुरू असताना ज्या-ज्या वेळी कामात त्रृटी जाणवल्या त्या-त्या वेळी आपण आवाज उठविला. या कामाच्या विरोधात प्रशासनाकडे लेखी तक्रारीही केल्या आहेत. मात्र राजकीय दबावातून हे काम रेटवून नेण्यात आले. काम सुरू असताना ते निकृष्ट आहे हे घुमे यांना का दिसले नाही? तेव्हा त्यांनी या कामाच्या विरोधात तोंडातून ब्र देखील का काढला नाही? आता अचानक त्यांना साक्षात्कार कसा झाला? असे सवाल ॲड.खलिफे यांनी उपस्थित केले आहेत.
दिवटेवाडी येथील देवझरिच्या कामासाठी तेथील स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार आपण 50 लाख रूपयांचा निधी मंजूर करून आणला. मात्र शहराच्या विकासासाठी घुमे यांनी आजवर एक रूपया निधी तरी आणला का, ते त्यांनी जाहीर करावे. आणि जर त्या कामात काही त्रुटी असतील तर स्थानिक ग्रामस्थ त्यावर बोलतील. शहरात सत्तेत असलेल्या महायुतीच्या निधीतून अनेक निकृष्ट कामे झालेली आहेत. ती घुमे यांना का दिसत नाहीत असा सवाल करत स्वतःच ठेवायचं झाकून अशी घुमे यांची भूमिका असल्याचा टोलाही ॲड.खलिफे यांनी लगावला आहे.
यापूर्वी अनेकदा शहरातील मतदारांनी ज्यांना नाकारले, मतांचा दुहेरी आकडाही गाठता आला नाही, अशा घुमे यांना आता पुन्हा नगरपरिषद निवडणुकी स्वप्ने पडू लागली आहेत. अनपेक्षितपणे भाजपा तालुकाध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडल्याने हुरळून गेलेले घुमे आता नगरपरिषद निवडणुकीसाठी गुढग्याला बाशिंग बांधून आहेत. त्यामुळे माझ्यावर बालिश आरोप करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी त्यांचा हा आटापिटा सुरू आहे, असा टोलाही ॲड.खलिफे यांनी लगावला आहे.
आपण एका मोठ्या पक्षाचे जबाबदार तालुकाध्यक्ष आहात, याचे भान ठेवून एखाद्या विषयी परिपूर्ण माहिती घेवून नंतर आरोप करा आणि दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा आधी स्वत:च्या प्रभागातील विकास कामांसाठी निधी आणा, असा सल्लाही ॲड.खलिफे यांनी दिला आहे.