भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेची कारवाई.
जनशक्तीचा दबाव न्यूज | विशाखापट्टणम | सप्टेंबर ०९, २०२३.
तेलगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. टीडीपीनं याबाबत माहिती दिली आहे. भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने चंद्राबाबू नायडू यांना आज शनिवारी सकाळी ०६:०० वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. त्यांच्यावर आज सकाळी अटकेची कारवाई करण्यात आल्यामुळे आंध्रप्रदेशात खळबळ उडाली आहे. चंद्राबाबू यांच्या अटकेमुळे आंध्रातील राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, चंद्राबाबू यांचा मुलगा नारा लोकेश यालादेखील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आल्याचे समजते.
कौशल्य विकास घोटाळ्यात चंद्राबाबू नायडू यांना आरोपी १ म्हणून नाव देण्यात आलं आहे, ज्यात २५० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. नायडू यांच्यावर २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिकार्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या वकिलांना कौशल्य विकास प्रकरणात आंध्रप्रदेश उच्च न्यायालयानं जारी केलेल्या एफआयआरची प्रत आणि इतर आदेशांची माहिती दिली आहे. दरम्यान, चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या वकिलांनी त्यांच्या नावाचा एफआयआर अहवालात उल्लेख नसल्याचं सांगत तपास अधिकार्यांना प्रथमदर्शनी पुरावे देण्याची विनंती केली आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी आपल्या दौऱ्यादरम्यान नांदयाल जिल्ह्यातील बनागनपल्ली येथे जाहीर सभेला संबोधित केलं होतं. जाहीर भाषणानंतर नायडू आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आराम करत होते. शनिवारी पहाटे ०३:३० च्या सुमारास, नायडू यांना अटक करण्यासाठी एपी सीआयडी त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आले, परंतु पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी वाहनाला घेराव घातला आणि आंध्र प्रदेश सीआयडीला चंद्राबाबूंना अटक करू दिली नाही.
चंद्राबाबूंच्या टीडीपीचे नेते, कार्यकर्ते आणि आंध्र प्रदेश सीआयडी पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यानंतर सकाळी ०६:०० च्या सुमारास चंद्राबाबू नायडू व्हॅनमधून खाली उतरले आणि त्यांनी पोलिसांशी चर्चा केली. त्यांच्या अटकेसाठी ५१CrPC अंतर्गत नोटीस जारी करण्यात आली होती. नायडू यांनी या प्रकरणाचा तपशील मागितला. मात्र पोलिसांनी माननीय न्यायालयासमोर तपशील सादर केल्याचं सांगत तपशील देण्यास नकार दिला. नायडू यांची चौकशी केल्यानंतर या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि रिमांड अहवाल देण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं. नायडू यांनी पोलिसांना सहकार्य करण्याचं मान्य केलं. अखेर पोलिसांनी चंद्राबाबू नायडू यांच्यावर अटकेची कारवाई केली.