किल्ले रायगडावर १ जून ते ७ जून या कालावधीत ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. या कालावधीत गडावर लाखो शिवभक्त आणि पर्यटक दाखल होण्याची शक्यता आहे हीबाब लक्षात घेऊन रायगड किल्ला परिसरात तब्बल २ हजार पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सात दिवस चोविस तास हा बंदोबस्त तैनात असणार आहे. त्यामुळे किल्ले रायगडाला सध्या छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
राज्यसरकारच्या वतीने यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य स्वरुपात साजरा केला जाणार आहे. १ जून ते ७ जून या कालावधीत गडावर विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजसदरेवर भव्य राजवाड्याच्या धर्तीवर मंडप उभारण्यात आला आहे. या दिवसात लाखो शिवभक्त गडावर दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गडावरील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यमंत्री मंडळातील अनेक मंत्री आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सोहळ्याला २ जूनला हजेरी लावणार आहेत. या त्यामुळे या संपुर्ण परिसराला छावणीचे स्वरुप प्रात् झाले आहे. २ हजार पोलीस येथे २४ तास रात्रंदिवस तैनात असणार आहेत.
रायगडावर १०९ सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गडावर आणि गडाखाली ३ ठिकाणी या सिसिटीव्ही कॅमेऱ्यामधील हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. गडावर १० ठिकाणी कायम स्वरुपी सिसिटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. तर गडाच्या पायथ्याशी १० ठिकाणी तात्पुरती सिसिटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.