
नवी दिल्ली :- भारत आणि युनायटेड किंगडम (UK) यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर (FTA) स्वाक्षरी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांच्या उपस्थितीत गुरूवारी झालेल्या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे.
भारत-यूके कराराचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे, ब्रिटनहून आयात होणाऱ्या स्कॉच – व्हिस्की आणि इतर मद्यावरील आयात शुल्क तब्बल १५०% वरून निम्म्यावर येणार असल्याने, भारतीयांना आता विदेशी मद्य कमी किमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हा करार भारतीय ग्राहकांसाठी विदेशी मद्य स्वस्त करणारा ठरणार असला तरी, दुसरीकडे भारताच्या स्थानिक आणि पारंपरिक उत्पादनांना जागतिक स्तरावर एक नवी ओळख आणि हक्काची बाजारपेठ मिळवून देणारा ठरणार आहे.
भारत-यूके मधील FTA कराराची
वैशिष्ट्ये आणि फायदे
अनेक वर्षांच्या चर्चेनंतर झालेल्या या करारामुळे दोन्ही देशांमधील वार्षिक व्यापार ३४ अब्ज डॉलरने वाढण्याची अपेक्षा आहे. या करारानुसार,
भारतातून ब्रिटनला होणाऱ्या ९९% निर्यातीवरील शुल्क रद्द होणार आहे. यात कापड, जेनेरिक औषधे, वैद्यकीय उपकरणे, चामड्याच्या वस्तू आणि कृषी उत्पादनांचा समावेश आहे.

ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या ९०% वस्तूंवरील सीमाशुल्क (Customs Duty) कमी होणार आहे, ज्यामुळे व्हिस्की, कार आणि इतर ब्रिटिश उत्पादने स्वस्त होतील.
कोणती विदेशी मद्य स्वस्त होणार ?
भारत-यूके या दोन देशातील FTA करारामुळे ब्रिटनमधून येणाऱ्या
मद्यावरील आयात शुल्क सध्याच्या १५०% वरून थेट ७५% पर्यंत कमी केले जाईल. पुढील १० वर्षांत हे शुल्क ४०% पर्यंत खाली आणण्याचे लक्ष्य आहे. यामुळे खालील प्रसिद्ध बँड्सच्या किमती कमी होऊ शकतातः
व्हिस्की: जॉनी वॉकर, शिवाज रिगल, ग्लेनमोरँजी आणि जुरा यांसारखे स्कॉच ब्रँड्स.
जिनः टँकरेल (Tanqueray), बॉम्बे सफायर (Bombay Sapphire), बिफीटर (Beefeater) आणि गॉर्डन्स (Gordon’s) यांसारखे प्रीमियम जिन.
किमतीत किती फरक पडणार ?
एका अंदाजानुसार, सध्या ३,००० रुपयांना मिळणारी स्कॉच व्हिस्कीची बाटली या करारानंतर १,२०० रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकते. तर ४,००० रुपयांची जिनची बाटली १,६०० रुपयांना मिळण्याची शक्यता आहे.
गोव्याची फेणी, नाशिकची
वाईन थेट ब्रिटनच्या बाजारपेठेत
या कराराचा फायदा केवळ आयातीपुरता मर्यादित नाही, तर भारतीय उत्पादनांनाही जागतिक बाजारपेठ मिळाली आहे. गोव्याची प्रसिद्ध फेणी, नाशिकची वाईन आणि केरळची ताडी यांसारख्या पारंपरिक भारतीय पेयांना आता ब्रिटनच्या बाजारपेठेत अधिकृत स्थान मिळेल. ही भारतीय पेये आता स्कॉच व्हिस्कीसारख्या जागतिक बँड्ससोबत स्पर्धा करतील. नैसर्गिक आणि पारंपरिक उत्पादनांना ब्रिटनमध्ये वाढती मागणी असल्याने या पेयांना चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. या करारामुळे भारताच्या मद्य निर्यात क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, सध्या ३७०.५ दशलक्ष डॉलर्स असलेली निर्यात २०३० पर्यंत १ अब्ज डॉलर्सवर नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर