राजभवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची घेतली भेट..
*रत्नागिरी :* कोकणच्या विशेषतः रत्नागिरीच्या प्रादेशिक विकासासाठी राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली. आंबा, काजू बागायतदारांच्या समस्या मांडल्या. मच्छीमारांसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जागतिक पातळीवरचे बंदर उभे राहावे. तसेच कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, चिपळूण- कराड मार्ग, वैभववाडी-कोल्हापूर मार्ग आणि जयगड- डिंगणी मालवाहतूक रेल्वे होण्याकरिता राज्यपालांसोबत सकारात्मक चर्चा केल्याची माहिती माजी आमदार बाळ माने यांनी दिली.
श्री. माने यांनी माजी आमदार राजन तेली, सौ. माधवी माने, मिहिर माने, विराज माने यांच्यासमवेत राज्यपाल राधाकृष्णन् यांची मुंबईतील राजभवनात भेट घेतली. सी. पी राधाकृष्णन यांनी 31 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. चार दशकांहून अधिक राजकीय, प्रशासकीय अनुभव त्यांच्याकडे आहे. याच अनुषंगाने कोकण विकासाबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे श्री. माने म्हणाले.
यासंबंधी श्री. माने यांनी पत्रकारांना सांगितले की, कोकणात प्रादेशिक विकासाचा असमतोल, प्रलंबित विकास प्रकल्पांविषयी चर्चा केली. राज्य शासनसह केंद्र सरकार, केंद्रीय गृह मंत्रालय, आणि प्रधानमंत्री कार्यालयाकडे राज्यपाल पाठपुरावा करू शकतील. कोकण रेल्वेचे दुपदारीकरण, वैभववाडी- कोल्हापूर रेल्वेमार्ग, चिपळूण ते कऱ्हाड आणि डिंगणी- जयगड मालवाहतुकीसाठी रेल्वेमार्गाबाबत चर्चा केली. याकडे राज्यपाल म्हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती केली.
श्री. माने म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा, काजू शेतकरी अडचणीत आहेत. बॅंकांची थकित कर्जे आहेत. त्यांना नव्याने कर्ज मिळत नाही. त्यांचे कर्ज माफ व्हावे आणि सवलतीच्या दरात व सीबिल स्कोअर न पाहता विशेष बाब म्हणून आंबा, काजू बागायतदारांना उभे राहण्यासाठी प्रयत्न करावा. हवामानातील बदलामुळे आंबा, काजू पिकाचे रक्षण होत नाहीये. त्याकरिता फवारणीसाठी महागडी औषधे घ्यावी आहेत. त्यामुळे पर्यायी औषधांचे संशोधन व्हावे, ही औषधे कमी किंमतीत मिळावीत, यासाठी आयसीआर यांना राज्यपालांनी सांगावे, अशी विनंती केली आहे. काजूला हमीभाव मिळावा. तसेच आंबा उत्पादक शेतकऱ्याला वाहतूक व पॅकेजिंगसाठी सबसिडी द्यावी.
*जागतिक पातळीचे मच्छीमारी बंदर हवे…*
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील काही तांत्रिक त्रुटी दूर झाल्या पाहिजेत. मच्छीमारांना रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात जागतिक दर्जाचे बंदर हवे आहे. त्याचबरोबर मत्स्य प्रक्रिया उद्योगांना प्राधान्याने निर्यातीसाठी अधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी केल्याचे बाळ माने यांनी नमूद केले.