
मुंबई- महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबई तसेच पुण्यात गणपती बाप्पांचे विशेष आकर्षण आहे. मुंबईतील लालबागचा राजा असो किंवा श्री सिद्धिविनायक असो राज्यभरातून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. राजकीय वर्तुळात देखील गणेशोत्सवानिमित्त एकमेकांच्या घरी बाप्पांचे दर्शन घ्यायला जातात तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे गणपतीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जात असल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांनी गणपतीच्या दर्शनासाठी येण्याचे फोन करून निमंत्रण दिले होते. या निमंत्रणाला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानुसार सहकुटुंब उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी पोहोचले आहेत.

राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणपती दरवर्षी बसवला जातो. अनेक सिनेकलाकार व राजकीय नेते मंडळी यावेळी गणपती बाप्पाच्या पूजेसाठी तसेच आरतीसाठी जमतात. यंदाच्या वर्षी उद्धव ठाकरे हे दर्शनासाठी दाखल झाले आहेत. मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही बंधू एकत्र येत विजयी मेळावा घेतला होता. या मेळाव्यात दोन्ही नेते एकाच मंचावर उपस्थित होते.
राजकीय वर्तुळात देखील आता दोन्ही ठाकरे बंधू युती करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विजयी मेळावा घेतल्यानंतरच शिवसेना आणि मनसे एकत्र येत युती करतील अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, अद्याप तरी त्यांनी अधिकृत युतीची घोषणा केलेली नाही. परंतु, आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर