
राजापूर :- मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पुराचे पाणी शहरात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज बुधवारी सकाळी पुराचे पाणी जवाहर चौकाच्या दिशेने वाढू लागल्याने प्रशासनाने नागरिक व व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
गत आठवड्यात राजापूर शहरातील जवाहर चौकाला पुराच्या पाण्याचा वेढा बसला होता. मात्र सोमवारी पावसाने काहीशी उसंत घेतल्याने पाणी ओसरले. जनजीवन पूर्वपदावर आले. मात्र एक दिवस काहीशी उसंत घेतल्यानंतर पुन्हा मंगळवारी दुपारपासून पाऊस कोसळू लागला. त्यामुळे अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली असून, शहराला पुराच्या पाण्याची टांगती तलवार कायम आहे.