रत्नागिरी: शहरातील मारूती मंदिर येथे झालेल्या ६३व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत ७० हजार १२५ रुपयांचा महसूल शासनाला मिळाला असून, पाच हजार रसिकांनी या नाटकांचा आस्वाद घेतला. यावर्षी या स्पर्धेत नाट्यसंस्थांची संख्या कमी झाल्यांची खंत येथील रंगकर्मींकडून व्यक्त करण्यात येत होती; मात्र अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या उत्सवी नाटकांच्या महोत्सवातील नाटकांना स्पर्धेत सहभागी करून घेण्यात येणार असल्याची ग्वाही परिषदेने दिली आहे. त्यामुळे पुढील वर्षी स्पर्धेत संस्थांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
शासनाच्या या उपक्रमाची जिल्ह्याची प्राथमिक फेरी येथील केंद्रावर २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत स्वा. सावरकर नाट्यगृहात उत्साहात झाली. जिल्ह्यातील विविध ग्रामीण व शहरी भागातील स्पर्धेत आठ नाट्यसंस्थांनी सहभाग घेतला. विविध विषयांच्या संहितांचे सादरीकरण रसिकांना पाहायला मिळाले. यावर्षी ४ हजार ९९५ रसिकांनी नाटकांचा आस्वाद घेतला. स्पर्धेत नाटकाच्या तिकीटविक्रीतून येणाऱ्या रक्कमेपैकी निम्मी रक्कम ही नाटक सादर करणाऱ्या संस्थेला दिली जाते. शासनाकडून नाटकाला प्रेक्षकवर्ग लाभावा यासाठी केवळ १० आणि १५ अशा अत्यल्प दरातील तिकिटांची विक्री केली जाते. काही नाट्यसंस्था तिकिटांचे अॅडव्हान्स बुकिंगही करतात. रत्नागिरी केंद्रावर सादर झालेल्या चार नाटकांना रसिकांची भरपूर गर्दी झाली. त्यापैकी पाली येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथ आणि इतर देवस्थान संस्थेने सादर केलेल्या ”अखेरचा सवाल” या नाटकाला तर हाऊसफुल्लचा फलक लावावा लागला. त्यानंतर येथील संगीतक्षेत्रात कार्यरत असणारी नावाजलेली संस्था खल्वायन-रत्नागिरी या संस्थेचे नाटकही शेवटच्या टप्यात हाऊसफुल्ल झाले. प्रायोगिक थिएटर्स असोसिएशनचे महानायक, कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थीसंघाचे कढीपत्ता या नाटकानाही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.