
चिपळूण, दि. २२ : शहरातील कोल्हेखाजण येथे भीषण अपघातात वीज वाहक तार कोसळल्यामुळे पाच दुभत्या म्हशींचा जागीच मृत्यू झाला असून एक म्हैस गंभीर जखमी झाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शेतकरी प्रमोद पांडुरंग कदम यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद कदम यांच्या मालकीच्या म्हशी नेहमीप्रमाणे कोल्हेखाजण परिसरातील मोकळ्या जागेत चरण्यासाठी गेल्या होत्या. याचदरम्यान, महावितरणच्या विद्युत वाहक तारा अचानक कोसळल्याने पाच म्हशी जागीच मृत्युमुखी पडल्या, तर एक म्हैस दोन्ही पायांनी अपंग झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
या प्रकारामुळे ग्रामस्थांत संतापाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत निष्काळजीपणाबाबत नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे केली. त्यानंतर ग्रामस्थांच्या आग्रहाखाली महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याला शासनामार्फत जास्तीत जास्त आर्थिक मदत दिली जावी अशी मागणी होत आहे.