*पुणे-* वेताळ टेकडी ही जैवविविधता संपन्न असून, या टेकडीवर नुकतेच दुर्मिळ असा युरोपियन हनी बझर्ड म्हणजे युरोपियन मधुबाज पक्षी आढळून आला आहे. या पक्ष्याचे छायाचित्र देखील टिपले आहे. पक्षी निरीक्षण करताना याची नोंद झाली आहे. पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात पहिल्यांदा हा पक्षी पहायला मिळाला असल्याचे जाणकारांनी सांगितले.
वेताळ टेकडीवर १३० हून अधिक पक्षी पहायला मिळतात. त्यामध्ये आता या मधुबाजची भर पडली आहे. त्यामुळे ही वेताळ टेकडी वाचविणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत टेकडीप्रेमींनी व्यक्त केले आहे. मधुबाज हा पक्षी युरोपातून स्थलांतर करुन आपल्या देशात आला. त्याचे दर्शन वेताळ टेकडीवर होणे ही एक ऐतिहासिक नोंद ठरणार आहे. हिवाळ्यामध्ये अनेक पक्षी स्थलांतर करतात. परदेशातील अनेक पक्षी आपल्या भारतात येतात आणि प्रामुख्याने शिकारी पक्षी गवताळ प्रदेशात येतात.
शिकारी पक्ष्यांमधील ‘ओरिएन्टल हनी बझर्ड’ म्हणजेच मधुबाज हा पक्षी सर्वसामान्यपणे महाराष्ट्रात आढळतो. पण, याच कुळातील दुर्मीळ युरोपियन हनी बझर्ड मात्र आपल्याकडे दिसत नाही. या पक्ष्याची ही नोंद महाराष्ट्रातील पहिलीच आहे. वन विभाग आणि वेताळ टेकडी बचाव कृती समितीतर्फे नुकतेच बर्ड वॉक झाला. त्यामध्ये पुण्यातील पक्षी निरीक्षिक अनिरुद्ध गोखले,पंकज इनामदार, मयूर आरोळे, शमिक परब, निषाद होमकर यांचा समावेश होता. त्यांनी वेताळ टेकडीवर फिरताना त्यांना या पक्ष्याचे दर्शन झाले. या पक्ष्याचे छायाचित्र टिपल्यानंतर हा नेहमी दिसणारा मधुबाज असू शकतो, असं सर्वांना वाटले. पण आदेश शिवकर यांनी पक्ष्याची खरी ओळख सांगितली.