मुंबई: लालबागच्या राजाचा दरबार यंदा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती असणार आहे. यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने यंदा ही खास सजावट करण्यात आली आहे
यामुळेच लालबागचा राजा मंडळाने शिवाजी महाराजांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानवंदना दिली आहे. आज लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन होणार आहे. यावेळी येथे शिवकालीन द्वारही उभारण्यात आलं आहे.
लालबागचा राजा हे मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध असा गणपती मंडळ आहे. जिथे दरवर्षी अनेक दिग्गज आणि सेलिब्रिटी हे आवर्जून हजेरी लावत असतात. तसं कोट्यवधी भाविक या बाप्पाच्या चरणी लीन होत आहे.
गणेशोत्सवाचा प्रचंड जल्लोष हा मुंबईत असतो. ज्याची सुरुवात ही आता लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाने होणार आहे. आता गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आलेला आहे. अशावेळी लालबागच्या राजाची तयारी पूर्ण झाली आहे. मीडियाच्या माध्यमातून पहिलं दर्शन हे संपूर्ण राज्याला आणि देश-विदेशातील भक्तांना व्हावं यासाठी लालबागचा राजाने विशेष सोय केली आहे.
बाप्पाच्या आगमनाचा शुभ मुहूर्त केव्हा?
यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर (मंगळवार) रोजी साजरी केली जाईल आणि 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असणार आहे. म्हणजे यंदा दहाच दिवस गणेशोत्सव चालणार आहे.
हिंदू धर्मात भगवान गणेशाला सर्वात पूजनीय मानले जाते, म्हणून प्रत्येक काम करण्यापूर्वी श्रीगणेशाची पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी श्री गणेश प्रकट झाले असे मानले जाते. या दिवशी भगवान गणेश पृथ्वीवर येतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. अशी आख्यायिका आहे.
गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त:
उदयतिथीनुसार 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी सुरू होईल. या वेळी चतुर्थी तिथी 18 सप्टेंबर रोजी सकाळी 12:39 वाजता सुरू होईल आणि 19 सप्टेंबर रोजी दुपारी 1:43 वाजता संपेल.
श्री गणेश पूजनाचा मुहूर्त:
19 सप्टेंबर रोजी सकाळी 11:01 ते 01:28 पर्यंत श्री गणेशाच्या पूजेचा शुभ मुहूर्त असेल. दरम्यान, तुम्ही बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू शकता.
गणेश चतुर्थीची पूजा पद्धत:
श्रीगणेशाची मूर्ती स्वच्छ करावी. त्यानंतर एक कलश पाण्याने भरून त्यावर गणेशाची प्रतिष्ठापना करावी. त्यानंतर श्रीगणेशाला दुर्वा, फुलं अर्पण करून 21 मोदक अर्पण करावेत.