
१२ ऑक्टोबर/नवी दिल्ली–
इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यानंतरचे युद्ध गुरुवारी (12 ऑक्टोबर) सहाव्या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ऑपरेशन अजय अंतर्गत इस्रायलमधून देशात येणार्या इच्छुक भारतीयांच्या परतीसाठी पहिले विमान आज रवाना होईल. ते उद्या सकाळी म्हणजेच शुक्रवारी (13 ऑक्टोबर) 230 भारतीयाना घेऊन परतेल.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, “परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी (11 ऑक्टोबर) ऑपरेशन अजयची घोषणा केली होती. पहिले चार्टर विमान आज तेल अवीवला पोहोचेल. तर उद्या सकाळी भारतात परत येईल. आम्ही भारताचे प्रतिनिधी कार्यालय आणि तेल अवीव येथील दूतावासाच्या संपर्कात आहोत.

बागची पुढे म्हणाले, “इस्रायलमधून येऊ इच्छिणाऱ्या सर्व भारतीयांना परत आणण्यावर आमचे लक्ष आहे. आमचा सल्ला आहे की भारतीय लोकांनी स्थानिक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.” त्यांनी सांगितले की इस्रायलमध्ये सुमारे 18 हजार भारतीय आहेत.
बागची म्हणाले की, या हल्ल्यांकडे आपण दहशतवादी हल्ले म्हणून पाहतो. भारताने नेहमीच शांततापूर्ण सहअस्तित्वासह सार्वभौम पॅलेस्टिनी राज्याच्या स्थापनेसाठी इस्रायलशी थेट वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचा पुरस्कार केला आहे.