
अयोध्या- अयोध्यातील राम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल अशी माहिती उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी ट्विट करून दिली. बांधकाम पूर्ण झाले असून गर्भगृहाचे खांब १४ फुटापर्यंत तयार झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
त्याच दिवसापासून भक्तांना मंदिरात पूजा-अर्चाही सुरू करता येणार आहे. मंदिराचे बांधकाम तीन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण होईल. दुसरा टप्पा डिसेंबर २०२४ मध्ये तर २०२५ पर्यंत मंदिर पूर्णपणे आकाराला येईल.
दोन्ही मूर्तींची प्रतिष्ठापना
राम मंदिरात नवीन आणि जुन्या अशा दोन्ही राम मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याची योजना आहे. राम मंदिराच्या गर्भगृहाची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की रामनवमीच्या दिवशी सूर्याची किरणे थेट रामलल्लाच्या मूर्तीला अभिषेक करतील. त्या दिवशी मूर्तीच्या ललाटावर ५ मिनिटे किरणे राहतील. याला सूर्य तिलक असे म्हटले जाते.
तसेच रामलल्लाच्या मूर्तीसाठी अनेक ठिकाणांहून शिळा आणण्यात आल्या आहेत. यात नेपाळच्या गंडकी नदीतून आणलेल्या शालिग्राम शिळांचा समावेश आहे. मंदिरात स्थापना करण्यात येणारी मूर्ती ही भगवान श्रीरामच्या बालपणीची असेल. ही मूर्ती प्राचीन ग्रंथात नमूद केलेल्या शास्त्रीय पद्धतूनुसार साकारली जाणार आहे.