
जनशक्तीचा दबाव न्यूज | संगमेश्वर | मे १८, २०२३.
तालुक्यातील ग्रामपंचायत पिरंदवणेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या सौ. वैदेही विश्वास गुरव यांनी त्यांची हृदयद्रावक कहाणी आज पत्रकारांजवळ व्यक्त केली. “ग्रामपंचायत पिरंदवणेच्या उदासीन आणि अवसानघातकी कामांमुळे आज पावसाळा अवघा महिनाभर दूर असताना मी व माझे कुटुंबीय बेघर अवस्थेत आहोत. आम्हाला मोदीजींच्या पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल मंजूर होऊनही घर बांधण्यापासून ग्रामपंचायतीने रोखले आहे. माझी लहान लेकरं, पॅरलिसिसग्रस्त सासरे, वृद्ध सासू आणि ७५% दिव्यांग नवरा असे आमचे कुटुंब आहे. यातच मी गरोदर असल्याने देवरुख–रत्नागिरीमध्ये सततच्या फेऱ्या मारण्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराचा फटका मला व माझ्या कुटुंबियांना बसला आहे.”
“मुळ घराच्या जागेवर घर बांधण्याची परवानगी देण्यासाठी आमचे सहहिस्सेदार आमच्या स्वमालकीच्या २० गुंठे जागेची अवैध मागणी करत होते. त्यामुळे मी प्रशासनाकडून आमच्याच दुसऱ्या जागेत, ज्यावर केवळ माझे सासरे सदानंद हरिश्चंद्र गुरव यांचे नाव आहे; त्या जागेत घरकुल बांधण्याची परवानगी मिळवली. यासाठीही ग्रामपंचायत पिरंदवणेच्या ग्रामसेविका सौ. माया गुरखे, सदस्य श्री. प्रकाश गमरे, श्री. गजानन गुरव यांनी अतोनात अडचणी उभ्या केल्या. प्रसंगी गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश धुडकावले. माझ्या हितचिंतकांच्या दबावामुळे ग्रामपंचायत कार्यालयाकडून नाईलाजाने नव्या जागेसाठी प्रस्ताव करून आवश्यक कार्यवाही करण्यात आली.”
“त्यानंतर देखील गुरववाडीचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या ग्रा.पं. सदस्य श्री. गजानन गुरव यांनी आमच्या सासऱ्यांच्या मालकीच्या जागेत अधिकार दाखवण्याचे पाप केले. याला आमचे सहहिस्सेदार अॅड. वसंत गुरव यांनी फूस लावली असून त्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीवर दबाव करण्यात आला. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या वकिली पेशाचा गैरवापर करून याप्रकरणी चक्क गटविकास अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयात खेचण्याची धमकी दिली. आणि खरोखर त्यांनी माझ्यासहित ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात फिर्याद नोंदवली आहे.”
“माझी शारीरिक आणि कौटुंबिक स्थिती पहाता या धनदांडग्या वृत्तीच्या लोकांना, ग्रामसेविका आणि भ्रष्ट लोकप्रतिनिधींना उत्तर देण्यासाठी मी असमर्थ ठरत आहे. आपण सर्व पत्रकार बांधवांनी एका गरीब बहिणीची ही कैफियत महाराष्ट्र शासनापर्यंत पोहचवून आपले लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिळालेले बिरूद सिद्ध करावे ही विनंती याद्वारे करत आहे.”