आरजू टेक्सोल कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हादाखल..गुंतवणूकदाराकडून अखेरतक्रार; चौघांची नावे..

Spread the love

रत्नागिरी, ता. २४ ः रोजगार देण्याच्या नावाखाली भुलून लाखो रुपये गुंतवणूक करणाऱ्या अनेकांची फसवणूक केल्याची तक्रार झाल्यावर आरजू टेक्सोल कंपनीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल झाला आहे. गुंतवणूकदार पुढे आले असून, आपली १८ लाखांची या कंपनीने फसवणूक झाल्याची तक्रार ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी कंपनीच्या चार संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

प्रसाद शशिकांत फडके (रा. गावखडी), संजय विश्वनाथ सावंत, संजय गोविंद केळकर, अनी ऊर्फ अमर महादेव जाधव (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) अशी संशयित चार संचालकांची नावे आहेत. ही घटना २०२१ ते २३ मे २०२४ या कालावधीत मिरजोळे एमआयडीसी येथील आरजू टेक्सोल कंपनी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी… संशयित प्रसाद फडके, संजय सावंत, संजय केळकर आणि अनी ऊर्फ अमर जाधव यांनी आरजू टेक्सोल कंपनी या नावाने जून २०२१ मध्ये कंपनी स्थापन केली. २५ हजार ते ४० लाखांपर्यंत वेगवेगळ्या डिपॉझिटच्या १५ महिने, ३६ महिने व ६० महिने या मुदतीच्या कंपनीच्या योजना होत्या. राजेश प्रभाकर पत्याने (वय ५२) यांना या योजनांबद्धल माहिती सांगून त्यांना खिळे बनविण्याचे अॅटोमॅटिक मशिन, खिळे बनविण्याचा कच्चा माल, तसेच पुरविण्यात आलेला कच्चा माल तयार केल्यानंतर त्याबाबत मोबदला देतो, अशी आश्वासने दिली. १६ टक्क्यांप्रमाणे २ लाख ८८ हजार रुपये इतकी रक्कम दरमहा परतवा म्हणून देतो; तसेच १५ महिने झाल्यानंतर भरलेली डिपॉझिटची रक्कम परत करतो व तसे कंपनीमार्फत अॅग्रिमेंट करून देतो, असेही आश्वासन दिले. आजपर्यंत राजेश पत्याने तसेच त्यांच्यासारखे इतर गुंतवणूकदारांना कंपनीत गुंतवणूक केली. नंतर जादा परतवा देण्याचे आश्वासन देऊन गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यांना कोणतीही रक्कम तसेच इतर मोबदला न देता एकमेकांच्या साह्याने आपली १८ लाख रूपयांची; तसेच इतर गुंतवणूकदाराची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी राजेश पत्याणे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, कंपनीच्या संशयित चार संचालकांविरुद्ध फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरजू टेकसोल कंपनीवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कच्चा माल देतो सांगून अगरबत्ती बनवा, मेणबत्ती बनवा, मॉप बनवा असे सांगून अनेकांची फसवणूक केली आहे. डिपॉझिट रक्कम देऊन त्यावर व्याज देतो सांगून फसवणूक केली आहे. यामध्ये चारशेहून अधिक लोक फसलेले असून 30 ते 40 कोटी रुपयांची फसवणूक असण्याची शक्यता आहे. – धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी

तेव्हा अनेक गुंतवणूकदार कंपनीच्या एमआयडीसी कार्यालयावर धडकले होते. गोंधळ झाला म्हणून ग्रामीण पोलिस त्या ठिकाणी गेले होते. पोलिसांनी याबाबत तक्रार देण्याची मागणी केली. परंतु कोणीही तक्रार दिली नव्हती. अखेर फसवणूक झालेले गुंतवणूकदार पुढे आले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page