रत्नागिरीतील पत्रकार आक्रमक : जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुकनिदर्शने.
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारीसे यांनी केलेल्या बातमीचा राग मनात ठेवून त्यांच्या दुचाकीला धडक देवून त्यांची हत्या झाल्याच्या घटनेचा रत्नागिरीतील सर्व पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुकनिदर्शने करुन निषेध व्यक्त केला. हत्येला दोषी असलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर पत्रकार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला कडक शिक्षा करा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी शहरातील सर्व पत्रकार उपस्थित होते. महानगरी टाईम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी कोदवली येथून आपल्या दुचाकीने जात होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा थार गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, शशिकांत वारीसे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात आहे हे उघडच आहे . शशिकांत वारिसे यांनी ज्याच्या विरोधात बातमी प्रसिध्द केली, ते कार चालक पंढरीनाथ आंबेरकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारीसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते, त्यात वारिसे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला खूनच आहे. या घटनेचा आम्ही राज्यातील सर्व पत्रकार तीव्र शब्दात निषेध करीत असल्याचे सर्व पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या खटल्याची सुनावणी फास्टट्रॅक (जलदगती न्यायालयामार्फत) कोर्टात व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी पत्रकारांनी केली. राज्यातील पत्रकारांचा विविध पध्दतीने आवाज बंद करण्याचा होत असलेला प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारा नाही. वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे थांबले नाहीत तर राज्यातील पत्रकारांना उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा पत्रकारांनी शासनाला दिला आहे. यावेळी रत्नागिरीतील पत्रकारांनी आपल्या परखड प्रतिक्रिया व्यक्त करताना आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला शिक्षा होईल या पद्धतीचा तपास पोलीस यंत्रणेने करावा अशी मागणी करण्यात आली. तर राज्य शासनानेही अशा घटना पुन्हा होणार नाहीत यासाठी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. राज्यात कायद्याचा धाक वाटावा असे वातावरण निर्माण करणे शासनाची जबाबदारी आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी पत्रकरांच्यावतीने करण्यात आली. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी,सदस्य, पत्रकार उपस्थित होते. तर काँग्रेसच्यावतीने अश्विनी आगाशे, श्रीमती रुपाली सावंत, रिझवाना शेख यांनी आंदोलनात सहभागी होऊन हत्येचा निषेध केला.
शशिकांत वारिसेच्या कुटुंबाची जबाबदारी सरकारने घ्यावी…
रिफायनरी प्रकल्पाच्या दोन बाजू आहे. समर्थन व विरोध असे आमने-सामने असताना वृत्तपत्रांना दोन्ही बाजू समाजासमोर मांडणे आवश्यक आहे. शशिकांत वरिसे आपल्या वृत्तपत्रातून आपले काम करत होते. असे असताना विरोधात बातमी आली म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे. त्यामुळे शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी मागणी पत्रकारांनी केली.