
सहारणपूर :- उत्तर प्रदेशच्या सहारणपूर जिल्ह्यातील देवबंद येथे भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या प्राणघातक हल्ल्यात चंद्रशेखर आझाद जखमी झाले आहेत. त्यांना देवबंद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
चंद्रशेखर हे आज देवबंदच्या दौऱ्यावर होते. ते देवबेद येथे पोहचले असता त्यांच्या कारवर अचानक अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला. चंद्रशेखर यांना गोळी स्पर्श होऊन गेल्याने या हल्ल्यात ते जखमी आहेत. त्यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हे हरियाणाचा क्रमाक असणाऱ्या वाहनातून आले होते. या हल्ल्यात आझाद यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. तसेच वाहनावर गोळीबाराच्या खुणा उमटल्या आहेत. पोलिसांनी नाकाबंदी करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. यासोबतच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत, जेणेकरून हल्लेखोरांची ओळख पटू शकेल. या हल्ल्यात जखमी झालेल्या भीम आर्मी प्रमुख यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.