ग्रामपंचायत आणि त्यावरील प्रशासकीय संस्थांच्या माध्यमातून नागरिकांचे हित साधणे अभिप्रेत असते. मात्र काही ठिकाणी केवळ वैयक्तिक हितसंबंध जोपासण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गोरगरीब सामान्य जनतेवर अन्याय होत असेल आणि त्यासाठी वरिष्ठ पातळीवरील यंत्रणा सहकार्याची भूमिका घेत असतील तर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात वापरलेले अमोघ शस्त्र ‘सत्याग्रह’ या भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध वापरावे लागेल. मला जोपर्यंत न्याय मिळत नाही, माझ्या स्वमालकीच्या जागेत प्रशासनाच्या सहकार्याने होणारे अतिक्रमण जोवर मागे घेतले जात नाही तोवर मी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी २६ जानेवारी २०२३ रोजी पंचायत समिती कार्यालय, चिपळूण येथे आमरण उपोषण करण्याचा निर्णय मागे घेणार नाही. कोणत्याही दबावाला बळी न पडता मी न्यायासाठी लढा देणार अशी संतप्त प्रतिक्रिया कुडप, सावर्डे येथील रहिवासी श्री. नितीश केशव शिर्के यांनी दिली आहे.
या संदर्भात मा. जिल्हाधिकारी साहेब, रत्नागिरी यांना विनम्र निवेदन दिले असून यामध्ये विषयाचे गांभीर्य विषद केले आहे. सदर पत्रात माझे म्हणणे मांडताना मी पुढील मुद्दे प्रामुख्याने मांडले आहेत:
१. माझ्या मालकीचे व कब्जा वहीवाटीचे गट नं. २०१(१) व २०१(३) (शेताचे स्थानिक नाव:- घरठाण) व गट नं. १९१ (शेताचे स्थानिक नाव:- डुकराआंबा) तसेच श्री देव कालकाई वही पंच गट नं. २०२ (शेताचे स्थानिक नाव:- लिमेचे) हे सर्वच ७/१२ पहाता त्यामध्ये ग्रामपंचायत कुडपच्या म्हणण्यानुसार ‘बिबवीचा कातळ’चा उल्लेख दिसून येत नाही.
२. नमुना नं. २३ ताब्यातील रस्त्याच्या नोंद वहीमध्ये बिबवीचा कातळ ते देवशेतवाडी १ किमी लांबीचा व ६ फूट रुंदीचा रस्ता अशी नोंद असून कोणत्याही जमीन मालकांची संमतीपत्र व या सर्व ७/१२ ची नोंद नाही.
३. ग्रामपंचायतीच्या म्हणण्यानुसार बिबवीचा कातळ ते देवशेतवाडी या नावाचा रस्ता बनवण्याची मंजुरी आणली असून ती बिबवीचा कातळ येथून सुरु केली नसून शेताचे स्थानिक नाव : लिमेचे येथून सुरु करण्यात येत आहे.
४. देवशेतवाडीकडे जाणारा डांबरी रस्ता पूर्वीपासून अस्तित्त्वात असून त्यासाठी गट नं. २०१(१), २०१(३) या जागांमधून सुमारे १५ १⁄२ गुंठे जमीन सदर रस्त्याकरता वापरण्यात आलेली आहे.
५. यासंदर्भात दि. १० फेब्रुवारी २०२२, १० मार्च २०२२, २ मे २०२२, ४ मे २०२२ असे तक्रार अर्ज ग्रामपंचायत कार्यालय, कुडप यांना तर १० मार्च २०२२, १३ डिसेंबर २०२२ व ९ जानेवारी २०२३ रोजी बांधकाम विभागाला दिली आहेत.
६. मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती, चिपळूण यांना १० मी २०२२, २ ऑगस्ट २०२२, २३ ऑगस्ट २०२२, १० ऑक्टोबर २०२२ व १३ डिसेंबर २०२२ रोजी पत्र्यव्यवहार करून माझ्या समस्येबाबत जाणीव करून दिली होती. तसेच १५ जून २०२२ व ५ जानेवारी २०२३ रोजी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांचेकडे तक्रारही केली होती.
७. या सर्व कार्यालयांना तक्रार अर्ज देऊन सुद्धा तक्रार अर्जावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. किंवा त्याची दखल घेतल्याची सूचना आलेली नाही.
८. दि. २२ जानेवारी २०१४ रोजी जि.प., रत्नागिरी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना व ग.वि. अधिकारी, पं.स.ना पत्र क्र. रजिप/साप्रवि/ग्रापं/कार्या-६/२२४/१४ यामध्ये ज्या रस्त्यांच्या नोंदी ७/१२ सदरी व गाव नकाशामध्ये नाहीत अशा नोंदींबाबत ग्रा.पं.ने आपले ग्रा.पं. सभेत फेरविचार करून अशा नोंदी असलेल्या जमीन मालकांकडून ग्रा.पं.चे रस्त्यासाठी संमतीपत्र घेण्यात यावे अथवा अशा नोंदी रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी असे सांगितले आहे.
मात्र ग्रामपंचायत कुडपने या पत्राची कोणतही दखल घेतली नसून जोरजबरदस्ती करून माझ्या स्वमालकीच्या जागेमध्ये एका घरासाठी अनधिकृत रस्ता बनवून त्याचा अवैध वापर केला आहे. यामुळे माझे अतोनात आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे. त्यामुळे याउपर माझ्या जागेत तयार केलेला अनधिकृत रस्ता रहदारीसाठी तातडीने बंद करण्यात यावा व नमुना नं. २६ व नमुना नं. २३ ग्रामपंचायतीतील नोंद रद्द करून मिळावी. तसेच सदर प्रकरणाची संपूर्ण शहानिशा होऊन दोषींवर कायदेशी कारवाई करावी अशी मागणी या तक्रार अर्जांद्वारे केली होती.
तथापि अद्याप याबाबत कोणतेही उत्तर न आल्याने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी पंचायत समिती, चिपळूण येथे मी व माझा संपूर्ण परिवार आमरण उपोषणास बसणार आहोत. यामध्ये आमच्यापैकी कोणाच्या आरोग्यास अपाय झाला अथवा जीवितहानी झाली तर त्यासाठी संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था जबाबदार असेल. अशी माहिती श्री. शिर्के यांनी दिली.