मुंबई- प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे आज सायंकाळी ६ वाजून ३८ मिनिटांनी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. बेनेगल किडनीच्या समस्येने त्रस्त होते. अलीकडे काही दिवसांपूर्वीच त्यांनी ९० वा वाढदिवस साजरा केला. १४ डिसेंबर रोजी त्यांनी ९० वा वाढदिवस साजरा केला होता, यावेळी त्यांचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. बेनेगल यांच्या महत्त्वपूर्ण योगदानात ‘अंकुर’, निशांत’ या चित्रपटांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी दिवगंत राज कपूर यांची १०० वी जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी आयोजित आरके चित्रपट महोत्सवात त्यांचे उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित करण्यात आले होते.
चित्रपटांमध्ये कोणताही धांगडधिंगा न दाखवता तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा दिग्गज दिग्दर्शक म्हणून श्याम बेनेगल यांची ओळख होती. त्यांनी चित्रपटांमधून मांडलेली कथा, मुद्दे हे खरंच विचार करायला लावणारे आणि सुन्न करणारे असायचे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अंकुर’ चित्रपटाची तर संपूर्ण जगाला दखल घ्यावी लागली होती. सामाजिक मुद्द्यांवर चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे भाष्य करणाऱ्या कलाकाराचे आज निधन झालं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले जाणाऱ्या बेनेगल यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. समांतर चित्रपटसृष्टीचे प्रणेते असणाऱ्या बेनेगल यांनी मुख्य प्रवाहातील सिनेमे, तसेच आर्ट फिल्म्सच्या माधम्यातून वास्तववाद, सखोल अभ्यास आणि कथाकथनाची उत्कृष्टता दाखवून दिली. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपट सृष्टीतील एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जाते आहे.
बेनेगल यांनी १९७० आणि १९८० च्या दशकात भारतीय समांतर चित्रपट चळवळीची सुरुवात केली. ज्याद्वारे वास्तववाद आणि सामाजिक बाबींवर भाष्य केले गेले. ‘अंकुर’, ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘जुनून’, ‘मंडी’ यांसारखे चित्रपट भारतीय सिनेसृष्टीला देणारे हे निर्माते गेल्या शनिवारी ९० वर्षांचे झाले होते. २३ डिसेंबर रोजी मुंबईत त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपटांचं दिग्ददर्शन केलं होतं. श्याम बेनेगल यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं होतं. त्यांना 2013 सालचा कलामहर्षी बाबूराव पेंटर जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तसेच त्यांना पद्मश्री पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार अशा पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं होतं. त्यांना 2018 सालचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं.