NCP चे दोन्ही गट एकत्र येण्याचे वृत्त खोटे:अमोल मिटकरी यांची स्पष्टोक्ती; म्हणाले – दोन्ही गट एकत्र येत असतील तर आमच्या काही अटीशर्थी….

Spread the love

अकोला- राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्यासंबंधीच्या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याची स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बातम्यांत कोणतेही तथ्य नाही. त्या बातम्या पेरण्यात आल्या आहेत. पण हे दोन्ही पक्ष एकत्र येत असतील तर आमच्या काही अटीशर्थी आहेत, असे ते म्हणालेत. दरम्यान, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या एकीकरणाची चर्चा प्रत्यक्षात येणार नसल्याचा दावा करत पवार कुटुंबाला खोचक टोला हाणला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत भविष्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला नको असे विधान केले होते. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंबंधीचा कोणताही निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी यासंबंधीच्या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सूत्रांचा दाखला देत बातम्या पेरल्या…

राज्याचे क्रीडामंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत अजित पवारांनी शरद पवारांनी आपल्या पक्षातील गळती रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंबंधीचे विधान केल्याचा दावा केला जात आहे. पण अमोल मिटकरी यांनी अजित पवारांनी असे कोणतेही विधान केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रस्तुत बैठकीला मी स्वतः उपस्थित होते. अजितदादांनी पवारांच्या विधानासंबंधी कोणतेही विधान केले नाही. या प्रकरणी सूत्रांचा दाखला देत देणाऱ्या बातत्या धादांत खोट्या आहेत. पक्षाच्या बैठकीतील गोष्टी बाहेर जात असतील तर असे करणाऱ्यांवर पक्षाने कारवाई केली पाहिजे, असे ते म्हणालेत.

एकीकरणावर आमच्या काही अटीशर्थी..

मिटकरी पुढे म्हणाले, राष्ट्रवादीच्या बैठकीत पक्षाचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या मुद्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. हा विषयच आमच्या बैठकीच्या अजेंड्यावर नव्हता. यासंबंधीच्या बातम्या पेरण्यात आल्यात. त्यात कोणतेही तथ्य नाही. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आमच्या काही अटीशर्थी आहेत. दादांवर पातळी सोडून टीकाी करणाऱ्यांनी सर्वप्रथम त्यांची माफी मागावी. त्यानंतरच एकीकरणाची चर्चा होईल. शरद पवार हे देशाचे, राज्याचे व पक्षाचे मार्गदर्शक आहेत. पण दोन्ही पक्ष हे केवळ अजित पवार यांच्याच नेतृत्वात एकत्र आले पाहिजेत, असे ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांचा पवारांना खोचक टोला…

दुसरीकडे, भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी पवार कुटुंब व राष्ट्रवादीला खोचक टोला हाणला आहे. अजित पवार व शरद पवार एकत्र येण्याची चर्चा पवार कुटुंबात नेहमीच होते. पण पुढे जाऊन ही चर्चा प्रत्यक्षात येत नाही. आत्ताही यासंबंधीची चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात अजितदादा, शरद पवार व सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष आहे. हे तीन जण मिळूनच त्यांचा पक्ष होता. या तिघांच्या एकत्रीकरणाची अनेकदा चर्चा होते, पण गेल्या अडीच – तीन वर्षात ही चर्चा काही प्रत्यक्षात आली नाही. जयंत पाटील व रोहित पवार आदी नेते लांब उभे असतात. तुम्ही निर्णय काय घेणार ते सांगा, असे ते म्हणालेत.

शरद पवार गटाच्या आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता…

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाविषयीचा चेंडू खासदार सुप्रिया सुळे यांच्या कोर्टात टोलवला होता. सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे दोन्ही गट एकत्र येण्याविषयी योग्य तो निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी नेते व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. शरद पवार गटाची बुधवारी एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत या मुद्यावर उहापोह होण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाच्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट…

दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी बुधवारी शरद पवारांची भेट घेतली. तत्पूर्वी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही शरद पवारांची भेट घेतली. राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रंगली असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या या भेटीगाठी होत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीच्या पुढील रणनीतीविषयी वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page