
मुंबई :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. अचानक रात्री उशीरा ही भेट होत असल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
गेल्या काही दिवसांत राज ठाकरे यांनी भाजपनं घेतलेल्या काही भूमिकांवर टीका केली होती. आगामी मुंबई महानगरपलिकेची निवडणूक तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे आणि भाजप-शिवसेना युती होणार असल्याच्या चर्चा होत्या. पण गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता, राज ठाकरेंनी भाजपच्या काही भूमिकांना विरोध दर्शवला आहे. यापार्श्वभूमीवर फडणवीस राज ठाकरे यांच्यातील भेटीला महत्व आहे.
गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेनं २००० रुपयांची नोट चलनातू मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर राज ठाकरे यांनी या निर्णयावरुन मोदी सरकारला निशाणा बनवलं होतं. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर वादावर भाष्य करताना भाजपच्या भूमिकेला विरोध करताना वर्षानुवर्षे जी परंपरा सुरु आहे ती थांबविण्यात काही अर्थ नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. नुकत्याच झालेल्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावरुन झालेल्या वादावरही राज ठाकरेंनी भाष्य करताना ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं असं त्यांनी म्हटलं होतं.