अलौकिक दूरदृष्टी आणि प्रतिभासंपन्न नेतृत्त्व श्री. प्रमोदजी जठार – योगेश मुळे, संगमेश्वर.

Spread the love

नेतृत्त्व करण्यासाठी दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात; त्या म्हणजे नेतृत्त्व करू इच्छिणाऱ्या व्यक्तीस दूरदृष्टी असावी आणि अशी व्यक्ती प्रतिभासंपन्न असावी. बाकी इच्छाशक्ती, लोकप्रियता, नितीमत्ता या गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरीही प्रवाहात आल्यावर त्या शिकता येतात, समजून घेता येतात, कमावता येतात. व्यक्तीचा दृष्टीकोन सकारात्मक आणि पुढील २५ वर्षांत आपण कुठे असायला हवे इतका दूरगामी असला की लोक आपोआप जोडले जातात. सोबतच अशी व्यक्ती विविध क्षेत्रांची योग्य जाण ठेवणारी, अभ्यासू आणि कार्यकारणपद्धती समजून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी असेल तर प्रचंड मोठा जनसमुदाय त्याच्यामागे पर्वतासारखा निश्चल उभा राहतो. संघ विचारांनी प्रेरित, मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदी यांच्या विकासाच्या मार्गावरून मार्गक्रमण करणारे आणि मा. देवेंद्रजींचे निकटवर्तीय अशी ओळख आपल्या नित्यकर्मातून दृढ करणारे भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा भाजपा रत्नागिरी दक्षिणचे जिल्हा प्रभारी मा. श्री. प्रमोद जठार असेच एक आदर्श व संवेदनशील नेतृत्त्व.

पक्षाने आदेश दिला की तो सेवाभावी वृत्तीने पाळायचा हे तत्त्व अव्याहतपणे जपणारे, आपल्या कृतीतून अनेक कार्यकर्त्यांवर बिंबवणारे प्रमोद जठार याच कारणाने कार्यकर्त्यांच्या मनात आपले स्थान पक्के करतात असे अनेक वरिष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी सातत्याने विविध मंचावरून व्यक्त झालेले आहेत. पक्षाने आदेश दिला, “प्रमोदजी आपल्याला कणकवली विधानसभा लढायची आहे.” यावर प्रमोद जठार म्हणतात “हो.” पक्षश्रेष्ठी म्हणाले “तिथे राणे आहेत. आपल्याला त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवायची आहे.” प्रमोद जठारांचे उत्तर, “काही हरकत नाही, लढू आपण.” पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठी, “प्रमोदजी, लढाई मोठी आहे, मैदान मारायचे आहे.” यावर प्रमोद जठार हसत उत्तर देतात. “पक्ष पाठीशी असताना, पक्षाचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्राणपणाने लढेन. जिंकण्यासाठीच लढेन. माझा पक्षावर, पक्षाच्या विचारधारेवर आणि कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास आहे.” आणि मग जठारांनी मुंबईतून सिंधुदुर्गात येऊन राष्ट्रीय काँग्रेसमध्ये असलेल्या राणे साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक धैर्य एकवटून रवी फाटक यांच्याविरुद्ध उमेदवारी अर्ज सादर केला. आणि अवघ्या ३४ मतांनी अत्यंत अटीतटीचा झालेला रंगतदार सामना जिंकला. कमी वेळेत, कमी साधने हाताशी असताना आणि बलवान प्रतिस्पर्धी समोर असताना संपादन केलेला हा विजय प्राप्त झाला तो अलौकिक दूरदृष्टी आणि प्रतिभेमुळेच. “नशीब नेहमी शुरांनाच साथ देते.” ही गोष्ट यावेळी सत्यात उतरली. ज्या काळात भारतीय जनता पार्टी कोकणात लडखडत होती त्यावेळी प्रमोद जठार यांच्या रूपाने एक स्तंभ कणकवलीत स्थैर्य देण्याचा प्रयत्न करत होता. अवघ्या काही महिन्यांत आपल्या मतदारसंघात भरीव कार्य करून स्वतःची ओळख निर्माण करण्यात प्रमोद जठार यशस्वी झाले. स्वतःची शैली, स्वतःची कार्यपद्धती आणि तळमळीने काम करण्याची वृत्ती यांमुळे लोकप्रतिनिधी म्हणून तर ते यशस्वी ठरलेच सोबतच पक्ष नेतृत्त्वाचाही विश्वास जिंकण्यात त्यांना यश लाभले. इतकेच नाही तर जर सिंधुदुर्गात भाजपाला अभूतपूर्व यश मिळवायचे असेल तर माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे हे भाजपामध्ये आलेच पाहिजेत ही आग्रही भूमिका त्यांनी मांडली आणि अखेर भाजपा नेतृत्त्व आणि राणे यांच्यात समन्वय साधून भाजपला अजून एक यश मिळवून दिले.

कार्याचा आवाका जसजसा वाढत गेला तसतसा प्रमोद जठार यांचा पक्षातील सन्मान वाढत गेला. आज प्रमोद जठार विद्यमान आमदार नाहीत तरीही भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांनी आपले राजकीय, सामाजिक आणि पक्षीय काम चालूच ठेवले आहे. या कामातही त्यांनी नेतृत्वाला प्रभावित केले. राणे कुटुंबाच्या भाजपा प्रवेशाने सिंधुदुर्गात भाजपा खंबीर झाला आहे. आता पक्षाने त्यांच्यावर रत्नागिरी भाजपाची मरगळ झटकण्याची कामगिरी सोपवली आहे. एकेकाळी स्वर्गीय कुसुमताई अभ्यंकर, स्वर्गीय शिवाजीराव गोताड, श्री. बाळासाहेब माने यांच्यासारख्या धुरंधर लोकप्रतिनिधींनी राखलेला हा बुरुज सध्या कोलमडला आहे. त्याला आधार देण्याची जबाबदारी आता प्रमोद जठार यांच्यावर आहे. त्यामुळे कोकणातील सर्वपक्षीय प्रमुख आणि प्रभावी नेत्यांमध्ये प्रमोद जठार यांचे नाव आदराने घेतले जाते. याच गतीने त्यांचे काम सुरु राहिल्यास लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे प्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा मैदान गाजवण्याची संधी पक्ष त्यांना नक्कीच देईल असेही अनेक पदाधिकारी खाजगीत बोलत आहेत.

भारताच्या तेजस्वी इतिहासाचा दुर्दम्य अभिमान असलेला हा नेता छत्रपती संभाजी महाराजांचे कसबा, संगमेश्वर येथे भव्य स्मारक उभारावे यासाठी १०० कोटी रुपये निधीची मागणी करतो आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस तात्काळ त्यासाठी हिरवा कंदील दाखवतात. “मैं मेरी झांसी नहीं दुंगी” असे म्हणत रणकंदन करणारी कोकणची सुपुत्री मनकर्णिका अर्थात झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई यांचे जन्मगाव कोट येथे त्यांचे स्मारक उभारावे अशी मागणी केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. अजयकुमार मिश्रा यांच्याकडे केली. मागणीतील कळकळ, इतिहासाचा अभिमान आणि अशा स्वरुपाची मागणी करण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत यांनी प्रभावित झालेल्या मिश्रांनी कोट गावच दत्तक घेणार असल्याचे जाहीर केले. यामुळे आता केवळ स्मारकच नाही तर गावाचाही शाश्वत विकास होणार आहे.

‘सिंधुरत्न योजना’ समितीचे सदस्य म्हणून प्रमोद जठार यांनी मार्लेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी २ कोटी रुपये, श्री क्षेत्र परशुराम मंदिर विकासासाठी २ कोटी, राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेमध्ये वस्तुसंग्रहालय निर्मितीसाठी २ कोटी, पर्यटकांना दिशादर्शक व मार्गदर्शक ठरणारे क्यूआरकोडसहीत फलक लावण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांना मिळून ५ कोटी निधीची तरतूद करण्यात श्री. जठार यांचा सिंहाचा वाट आहे. सिंधुदुर्गमध्ये विजयदुर्ग किल्ल्यावर आरमार व ‘लाईट अँड साऊंड शो’साठी रुपये ५ कोटीची तरतूद करण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका मांडली होती.

“कोकणच्या विकासाची उंची त्याला लाभलेल्या समुद्राच्या खोलीत दडली आहे.” असा विचार सातत्याने मांडून इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत कोकण भाजपला उभारी देण्याचे काम करणारे प्रमोद जठार विविध विकास प्रकल्प कोकणात राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्नरत आहेत. नाणार रिफायनरीबाबत त्यांनी सर्वप्रथम भूमिका मांडली. आणि त्यांच्या भूमिकेवर ते इतके ठाम राहिले की ज्यांनी ज्यांनी विरोधात भूमिका घेतली; आज ते सर्व नेते रिफायनरी समर्थक झालेले आहेत. विकास प्रकल्प आणण्यासाठी पारीस्थितीकीचा सखोल अभ्यास असलेला एकमेव नेता म्हणजे प्रमोद जठार. आज मित्रपक्षाचे वा विरोधी पक्षाचे नेते रिफायनरीचे समर्थन करताना दिसतील. आता ज्यांना लोकांचे कल्याण होणे परवडणारे नाही असे नेते कोणत्याही अभ्यासाशिवाय लोकांच्या भावना आजही उद्दीपित करत आहेत. परंतू संबंधित रिफायनरीला विरोध करणाऱ्या सर्वांना एका सूत्रात गुंफून त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रमोद जठार यांनी केलेले प्रयत्न केवळ स्पृहणीयच. त्यामुळे आज ग्रीन रिफायनरी प्रत्यक्षात येण्याच्या टप्प्यावर आहे. राजकारणासोबत समाजकारण करताना विरोधकांचे टोकाचे आरोप सहन करत प्रसंगी सडेतोड उत्तरे देत रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारा भव्य प्रकल्प आता साकार होणार आहे. “प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, तेलही गळे” ही उक्ती सार्थ करणारे प्रमोद जठार यांच्यासारखे नेते विरळच.

शासकीय ऊस संशोधन केंद्र नापणे वैभववाडी येथे प्रस्तावित केले असतानाच वैभववाडी, खारेपाटण बसस्थानकाच्या जमिनीचा प्रश्न देखील प्रमोद जठार यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून मार्गी लावला. आडाळी येथे भारत सरकारच्या आयुर्वेद वनस्पती संशोधन केंद्राला मंजुरी मिळवून आणली. या प्रकल्पासाठी अनेक अडचणी आल्या. मात्र, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे याविषयी आपली मागणी लावून धरली आणि त्यानंतर सिंधुदुर्गवासियांना दिलेले आश्वासन पूर्ण झाले. सिंधुभूमी रुग्णवाहिका सेवेसाठी उपलब्ध करून त्यांनी आपले दायित्त्व निभावले. कोरोना काळात विरोधी पक्षाचे नेते व कणकवलीचे माजी आमदार या नात्याने डॉक्टर व रुग्णांना धीर देण्यासाठी पीपीई किट चढवून शासकीय रुग्णालयात जाऊन त्यांनी अनेक वेळा मार्गदर्शन केले आहे.

आनंदवाडी मच्छीमार बंदर, देवगडमधील पवनऊर्जा प्रकल्प तसेच आंबा कॅनिंग फॅक्टरी आदी प्रकल्पांच्या उभारणीतून शेती व विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या श्रमशक्तीला चालना दिली. सिंधुदुर्गात असणाऱ्या विजयदुर्ग किल्ल्यावर विश्वातील अत्यंत महत्त्वाचे असे मूलद्रव्य ज्याचा अणुक्रमांक २ आहे अशा हेलियमचा शोध १८६८ साली लागला. जळताना पिवळ्या ज्वाळा उत्सर्जित करणारे हे मूलद्रव्य पृथ्वीला जीवन प्रदान करणाऱ्या सूर्यावर अव्याहतपणे तयार होत असते. याच वैज्ञानिक तत्वाचा पाठपुरावा करून ‘जागतिक हेलियम दिवस’ सिंधुदुर्गात उत्सवाप्रमाणे साजरा करायला सुरुवात केली. यासोबतच वैद्यकीय क्षेत्रात जीएनएम नर्सिंग कॉलेज किंवा दुग्ध व्यवसाय क्षेत्रात सिंधुभूमी दुध डेअरीच्या माध्यमातून त्यांनी आपले कार्य सुरु ठेवले. ‘कोकण दुध’ हा ब्रांड आता घरोघरी पोचला आहे. व्यवसायाभिमुख होण्यासाठी लोकांना ते सातत्याने प्रेरणा देत राहिले.     

पक्षाने दिलेल्या अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत असतानाच पश्चिम बंगालच्या निवडणुकीतदेखील प्रमोद जठार यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. गोवा विधानसभा निवडणुकीत देखील प्रमोद जठार यांनी एका मतदारसंघात आपला प्रभाव पाडत विजयश्री खेचून आणली.

“होय… आहे मी रोजगार समर्थक! आहे मी ग्रीन रिफायनरीचा समर्थक!” अशी जाहीर भूमिका मांडत  अनेक विरोधकांचा सामना करणारे प्रमोद जठार आजही त्याच भूमिकेशी ठाम आहेत. “जनकल्याणाचे व्रत अंधतेने नाही तर जबाबदारीने घेतले आहे. आणि ते निष्ठेने पार पाडणे माझे कर्तव्य आहे. हीच माझी ईश्वरसेवा आहे, हीच माझी राष्ट्रभक्ती आहे याची चिरंतन जाणीव माझ्या हृदयात आहे.” असे म्हणणारे प्रमोद जठार जर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार असतील तर सिंधुदुर्गप्रमाणेच रत्नागिरीसाठीही हितकारक ठरणार आहे. या लेखाच्या माध्यमातून प्रमोदजींना शुभेच्छा देतानाच त्यांच्या अलौकिक दूरदृष्टी आणि प्रतिभेचा लाभ कोकणी माणसाच्या सर्वांगीण शाश्वत विकासासाठी होऊ दे हीच महालक्ष्मी अंबाबाईचरणी प्रार्थना.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page