
२० सप्टेंबर/नवी दिल्ली : खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येवरून थयथयाट करीत कॅनडाने एका भारतीय उच्चायुक्तांची हकालपट्टी केली. कॅनडाला जोरदार प्रत्युत्तर देत भारतानेही कॅनडाच्या उच्चायुक्तांना पाच दिवसांत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या आठवड्यात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे ‘जी- २०’ परिषदेच्या निमित्ताने भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करताना कॅनडातील खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचे प्रकरण उकरून काढले होते, जाहीर केले. त्यानंतर मायदेशी परतल्यानंतर जस्टिन ट्रुडो यांनी सोमवारी कॅनेडियन संसदेसमोर बोलताना निज्जरच्या हत्येचे खापर भारतावर फोडले.
कॅनडाच्या सार्वभौमत्वाचे हे उल्लंघन असल्याचेही ते म्हणाले. भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांनी कॅनडात घुसून निज्जरची हत्या केल्याची माहिती कॅनेडियन गुप्तचरांनी आपल्याला दिल्याची माहिती त्यांनी दिली. टुडो यांच्या भाषणानंतर लगेच कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जॉली यांनी भारतीय उच्चायुक्तांची हकालपट्टी करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
काय आहे प्रकरण?
जून महिन्यात कॅनडाच्या सरे या शहरात हरदीपसिंग निज्जर याची हत्या करण्यात आली होती. गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये दोन तरुणांनी निज्जरवर गोळ्या झाडल्या. हरदीपसिंग निज्जर हा कट्टर खलिस्तानवादी असून, ‘खलिस्तान टायगर फोर्स’ साठी काम करीत होता. पंजाबातील खलिस्तानवादी चळवळीला बळ देण्याचे काम तो करीत आहे.