नवी दिल्ली:- काही दिवसांपूर्वी आरबीआयकडून दोन हजारांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, या दोन हजाराच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत आपल्या जवळील बँकेमधून बदली करण्याचे आदेश आरबीआयने सर्व नागरिकांना दिले आहेत. दरम्यान आजपासून या नोट बदलीला सुरुवात झाली असून नागरिक आपल्या जवळील बँकेमध्ये नोट बदलीसाठी गर्दी करत आहेत. बँकांमध्ये गर्दी वाढू नये यासाठी आरबीआयचे गव्हर्नर यांनी नागरिकांना आवाहन करत बँकेबाहेर गर्दी न करण्याची विनंती केली आहे.
महत्त्वाचं म्हणजे एका वेळी जास्तीत जास्त वीस हजारांच्या नोटा बँक स्वीकारणार आहे. २०१७ साली नोटबंदी करत मोदी सरकारने चलनातील पाचशे व हजारच्या नोटा रातोरात बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले होते. नोट बदलीसाठी बँकेच्या रांगेत उभ्या राहिलेल्या अनेक नागरिकांचा देखील मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावेळी केंद्र सरकारने पाचशे व हजारच्या नोटा बंद करत दोन हजाराची गुलाबी नोट चलनात आणली होती.
दरम्यान अशात आता पुन्हा एकदा दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. यामुळे केंद्र सरकारवर विरोधकांकडून टिकेची झोड उठत आहे. विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, असं मत विरोधकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.