रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा संगमेश्वर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्यदिव्य स्मारकस्थान निर्माण करण्यात यावे त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भरीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.तसे निवेदन त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिले असल्याची माहिती जठार यांनी दिली आहे.
जठार यांनी मराठा हिंदवी साम्राज्याचे प्रथम युवराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा येथे अटक होऊन पुढे निर्घृण हत्या करण्यात आली, हे सर्वांना माहित आहे. याच कारणासाठी येथे एक भव्यदिव्य स्मारक भवन असावे, अशी येथील जनतेची भावना आहे. तसेच कसबा येथून सुरवात केल्यास पुढे कारभाटले येथे म्हाळोजी घोरपडे यांचे समाधीस्थान, त्याच्या जवळच अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले शिवमंदिर, शृंगारपूर येथे महाराणी येसूबाई साहेबांचे माहेर आणि प्रत्यक्ष थोरले छत्रपती आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या वास्तव्याने पावन झालेले कसबा हे गाव अशी एक ऐतिहासिक मार्गिका येथे उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत बहुमूल्य ठेवा असे याचे वर्णन होईल. त्यामुळे या परिसरातील ऐतिहासिक ठेव्याचे जतन संवर्धन व्हावे या दृष्टीने राज्य शासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी जठार यांनी केली आहे.