मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस ‘संदीप देशपांडे’ यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्यावर हल्ला झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे. हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावू आले होते. आणि संदीप देशपांडे यांना स्टम्पने मारहाण केली असून, या हल्ल्यात देशपांडे जखमी झाले आहेत.
त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात हा हल्ला झाल्याने या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता मनसे कोणते आक्रमक पाऊल उचलणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी राज्यभर वाऱ्यासारखी पसरली असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे देखील रुग्णालयात जाऊन देशपांडे यांची भेट घेतली आहे. संदीप देशपांडे हे एक कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जातात.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या संदीप देशपांडे यांची प्रकृती नॉर्मल आहे. त्यांच्या पायाला आणि हाताला मार लागला आहे. पायावर जास्त मार लागला आहे. मात्र, डोक्याला किंवा शरीरावर इतरत्र कुठेही मार लागला नाही. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना काही तासांनंतर डिस्चार्ज देण्यात आला.
दरम्यान, रुग्णालयातून बाहेर येताच संदीप देशपांडे यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. यावेळी ते म्हणाले, “आम्ही कुणाला घाबरत नाही… आणि घाबरणार देखील नाही. माझ्यावर हल्ला करण्यामागे कोण लोक आहेत. हे सर्वांना माहीत आहे..’ असं संदीप देशपांडे म्हणाले.