महालक्ष्मी मंदिराच्या कलशारोहणाच्या वर्धापन दिनानिमित्त उद्यापासून कार्यक्रम

Spread the love

रत्नागिरी ,10 मे 2023-
रत्नागिरी शहराजवळील पोमेंडी खुर्द-काजरघाटी येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या कलशारोहण समारंभाचा सहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने १२ मे रोजी महावस्त्रहरण या तुफान विनोदी मालवणी नाटकाचा प्रयोग होणार आहे. वर्धापन दिनानिमित्त ११ आणि १२ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महालक्ष्मी मंदिराचा जीर्णौद्धार केल्यानंतर मोठ्या उत्साहात कलशारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला होता.

या कलशारोहणाचा सहावा वर्धापन दिनानिमित्त ११ मे रोजी रात्री १० वाजता आंबेड खुर्द बोलेवाडी (ता. संगमेश्वर) येथील श्री यशवंती देवी नमन नाट्य मंडळाचे बहुरंगी नमन सादर होणार आहे. १२ मे रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत अभिषेक, सप्तशती पाठ, हवन, श्री सत्यनारायण महापूजा होईल. दुपारी ३ वाजता प्रासादिक भजने, सायंकाळी ७ वाजता धुपारती, ७.३० वाजता प्रासादिक भजने होईल. सायंकाळी ७.३० ते १० या वेळेत महाप्रसाद होईल. त्यानंतर रात्री १० वाजता प्रसिद्ध लेखक गंगाराम गवाणकर यांचे दोन अंकी महावस्त्रहरण हे मालवणी नाटक अक्षय थिएटर्स सादर करणार आहेत.

या कार्यक्रमांना सर्व भक्तगणांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महालक्ष्मी देवस्थानने केले आहे. दरम्यान, महालक्ष्मी देवस्थानतर्फे भाविकांच्या आग्रहावरून दर मंगळवारी श्रींवर अभिषेकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानने केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page