राजकारणी मंडळींनाही आवरता येत नाही मुळये मिसळचा मोह ,विनायक राऊत यांनी घेतला मुळये मिसळचा आस्वाद!…

Spread the love

जे डी पराडकर/संगमेश्वर- राजकारणी मंडळी आपल्या दौऱ्यात अनेकदा तहानभूक विसरून प्रवास करत असतात. नियोजित दौऱ्यात, कार्यक्रम स्थळी वेळेत पोहोचण्यासाठी राजकारणी मंडळींना प्रसंगी तहानभूकही विसरावी लागते. एखाद्या प्रसंगी थोडा निवांत वेळ असेल तर, राजकारणी मंडळी देखील चविष्ट नाष्टा कोठे मिळतो ,याचा शोध घेत असतात. शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी ओझरखोल येथील प्रसिद्ध मुळ्ये मिसळ स्टॉलला भेट देऊन नुकताच मुळ्ये मिसळचा आस्वाद घेतला.

संगमेश्वर नजीकच्या ओझरखोल येथे बस थांब्या जवळच समीर आणि मनीषा मुळ्ये यांचा प्रसिद्ध मुळ्ये मिसळचा स्टॉल आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणारे अनेक प्रवासी मुळ्ये मिसळ आणि वड्याचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आवर्जून थांबतात. शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या कानावर ओझरखोल येथील मुळ्ये मिसळची कीर्ती पोहोचली होती. चिपळूण येथील आपल्या नियोजित दौऱ्याच्या प्रसंगी राऊत यांनी आवर्जून नाश्ता करण्यासाठी तडक ओझर खोल येथील मुळ्ये मिसळचा स्टॉल गाठला. मुळ्ये मिसळचे समीर आणि मनीषा मुळ्ये यांनी माजी खासदार विनायक राऊत यांचे प्रथम स्वागत केले. मुळये यांची प्रसिद्ध मिसळ खाल्ल्यानंतर राऊत यांनी मुळ्ये दांपत्याचे कौतुक केले. मुळ्ये मिसळ खवय्यांच्या पसंतीस का उतरली,  याचे उत्तर आपल्याला आज या मिसळीची चव घेतल्यानंतर मिळाल्याचे मत माजी खासदार विनायक राऊत यांनी यावेळी नमूद केले.

निसर्गरम्य ठिकाणी, मंदिराच्या जवळच तसेच मुंबई गोवा महामार्गाला लागून ओझरखोल सारख्या ग्रामीण भागात मुळ्ये, हे मराठी दांपत्य एका स्टॉलच्या माध्यमातून दर्जेदार मिसळ आणि बटाटे वडा खवय्यांना आणि पर्यटकांना खाऊ घालून व्यवसाय करत असल्याबद्दल शिवसेना नेते विनायक राऊत यांनी समीर आणि मनीषा मुळ्ये यांचे अभिनंदन करून कौतुक केले. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्णत्वास येईपर्यंत मुळ्ये दांपत्याने आपल्या स्टॉलचा विस्तार करावा, अशा शुभेच्छाही राऊत यांनी समीर आणि मनीषा यांना दिल्या. कितीही महागाई झाली तरी चव आणि दर्जा यामध्ये आम्ही कधीही तडजोड करत नसल्याने मुळ्ये मिसळची ख्याती आजही कायम असल्याचे समीर आणि मनीषा यांनी माजी खासदार विनायक राऊत यांना सांगितले.

संगमेश्वर नजीकच्या ओझरखोल येथील मुळ्ये मिसळचे संस्थापक जयंत आणि शिल्पा मुळये यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी स्वतः घरगुती मसाले तयार करून मुळ्ये मिसळ आणि चविष्ट बटाटेवडा याची मूळ रेसिपी तयार केली. अशा प्रकारची चव अन्य ठिकाणच्या मिसळ आणि बटाटेवड्यांना नसल्याने अल्पावधीतच खवय्यानी मुळ्ये मिसळला आणि वड्याला सर्वाधिक पसंती दिली. जयंत मुळये यांनी, मुळ्ये मिसळ थेट मुंबई येथील विविध ठिकाणी आयोजित केलेल्या मिसळ महोत्सवात पोहोचवली आणि खवय्यांना एक वेगळी चव चाखायला देऊन मिसळचा खरा आस्वाद दिला.

जयंत मुळ्ये यांचा मुलगा समीर आणि स्नुषा मनीषा  या दोघांनी गेली काही वर्षे ओझरखोल येथील आपल्या घराजवळच प्रसिद्ध मुळ्ये मिसळचा स्टॉल सुरू केला आहे. विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी येथील मिसळ आणि बटाटेवड्याचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. वेळात वेळ काढून राजकारणी मंडळी देखील मुळ्ये मिसळचा आस्वाद घेऊन याच्या चव दर्जावर शिक्कामोर्तब करत आहेत ही बाप नक्कीच कौतुकास्पद आहे .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page