देवरुख- रत्नागिरी जिल्ह्यातील मानधन/ कंत्राटी शिक्षकांनी कायम शिक्षण सेवक नियुक्ती मिळावी यासाठी १५ ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. काल सकाळच्या सत्रात शिक्षणाधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. आंदोलकांच्या आक्रमक भुमिकेमुळे शिक्षणाधिकारी परत गेले. दुपार नंतर जिल्हाधिकारी यांनी आंदोलन स्थळी येऊन चर्चेसाठी बोलावून घेतले. सदर चर्चेला जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून चर्चा केली.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून सर्वांना सहा महिन्यासाठी १० हजार रुपये मानधनावर इतर क्षेत्रात काम लगेच देतो. पण सहा महिन्यानंतर पुढे काय? तर पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होणार त्यामुळे कायम शिक्षण सेवक नियुक्ती मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार या आंदोलकांच्या ठाम भूमिकेमुळे चर्चेत तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे तिसऱ्या दिवशी देखील आज मानधन तत्वावरील शिक्षकांचे आंदोलन सुरूच आहे. जो पर्यंत कायम शिक्षण सेवक नियुक्ती मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांचे संयोजक सुदर्शन मोहिते यांनी सांगितले…