मार्चमध्येही कोकणातील रेल्वेगाड्यांना तुफान गर्दी! रेल्वेच्या नियोजनशून्य कारभार

Spread the love

मुंबई : एप्रिल-मे महिन्यात गर्दीतून वाट शोधत रेल्वेगाडीतील आसन शोधण्याचे दिव्य पार करण्याची सवय चाकरमान्यांच्या अंगवळणी पडली आहे. मात्र कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांसाठी मार्च महिन्यातच ही स्थिती निर्माण झाल्याने चाकरमान्यांच्या संतापात भर पडली आहे. संगमेश्वरहून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना ‘कोकणकन्या’ची आसने आरक्षित करूनही आसनांशेजारील मोकळ्या जागेत बसून प्रवास करण्याची नामुष्की ओढवली.

प्रवासी प्रथमेश सोलकर यांनी संगमेश्वरहून मुंबईकडे येणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या डब्यातील गर्दीचे छायाचित्र काढत रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचे वास्तव सर्वांसमोर मांडले.

आरक्षित तिकीट असलेले प्रवासीदेखील आसनांमधील मोकळ्या जागेत प्रवास करत असल्याचे या छायाचित्रात दिसत आहेत. स्वच्छतागृहांचा वापर करण्यासाठी या गर्दीतून वाट काढत जाताना महिलांना अडचणींना तोंड द्यावे लागते. यामुळे रेल्वे मंत्रालयासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणवासींचा प्रवास सुखकर करण्यासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी सोलकर यांनी समाजमाध्यमावर मांडली आहे.

कोकणातील रेल्वेगाड्यांसाठी संगणकावर आरक्षण पूर्ण असे दाखवले जात असताना रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांकडून चढ्या दराने कन्फर्म तिकिटांची सर्रास विक्री होते. जादा दरात तिकीट घेऊनदेखील प्रवासात आसने मिळत नाहीत. अनेकदा कोकणातून मुंबईत येणाऱ्या गाड्यांमध्ये परप्रांतीय मोठ्या प्रमाणात घुसखोरी करतात. पनवेल परिसरात गाडी पोहोचताच घुसखोर उड्या मारून धूम ठोकतात.

उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना प्रचंड मागणी असते. सुट्टीच्या काळात कोकणकन्या, मत्स्यगंधा, दिवा पॅसेंजर या गाड्यांची प्रतीक्षायादी शेकडोपार पोहोचते. सध्या मार्चमध्येच रेल्वे डब्यात गर्दी वाढल्याने एप्रिल आणि मेसाठी विशेष गाड्या चालवण्यात याव्या, अशी मागणी प्रवासी करीत आहेत

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page