सर्वोच्च न्यायालयाच्या हातोड्यानंतरही शिंदे सरकारचं डोकं ठिकाणावर नाही”; ठाकरे गटाचा राज्य सरकारला टोला

Spread the love

शिंदे फडणवीस सरकारवर उद्धव ठाकरे गटाची टीका

द्वेष मूलक वक्तव्यांबाबत म्हणजेच हेट स्पीचवर राज्य सरकारकडून कोणतीही कारवाई होत नाही, याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले होते. सरकारी व्यवस्था निष्क्रीय, शिथील बनली आहे. ती वेळेवर काम करत नाही. जर शांतच बसून राहणार असेल तर मग ही व्यवस्था आहे तरी कशासाठी, असे म्हणत न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या महाराष्ट्र सरकारवरील टिप्पणीवरून काल (३० मार्च) दिवसभरात विरोधी पक्षांनी राज्यतल्या शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं. दरम्यान, शिवसेनेचं (ठाकरे गट) मूखपत्र असलेल्या सामनातही आज हाच विषय पाहायला मिळाला.

‘नपूंसक लेकाचे’ या मथळ्याखाली आजचा ‘सामना’चा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. “धर्म ही अफूची गोळी आहे आणि ती बंदुकीच्या गोळीपेक्षा घातक आहे. धर्माचे राजकारण करून सत्ता मिळवणे आणि त्यासाठी लोकांचा बळी देणे ही नामर्दानगी आहे. मंत्रालयासमोर तिघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातील शीतल गाडेकरचा मृत्यू झाला. या घटनांकडे थंडपणे पाहत दाढीवर हात फिरवणे हेसुद्धा नपुंसकपणाचे लक्षण आहे. सर्वोच्च न्यायालयाने मिंधे (शिंदे-फडणवीस) सरकारच्या वर्मावरच घाव घातला. आता सर्वोच्च न्यायालयाने अवमान केला म्हणून सत्तेतले ‘चोर मंडळ’ नपुंसक शेऱ्यावरही हक्कभंग आणणार काय?” असा टोला ठाकरे गटाने ‘सामना’तून लगावला आहे.

अग्रेखात म्हटलं आहे की, “महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे, ते काहीच करत नाही म्हणून राज्यात धार्मिक तेढ विकोपाला जात असल्याचे आसूड देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत. शहाण्यांना शब्दांचा मार पुरेसा असतो, पण महाराष्ट्रातील सत्तेत कोणी शहाणेच राहिलेले नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या डोक्यात हातोडा मारूनही त्यांचे डोके ठिकाणावर आलेलं नाही.

मंत्रालयाबाहेर शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

“महाराष्ट्रात एकाच दिवशी मंत्रालयाच्या दारात तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात धुळे येथील शीतल गाडेकर यांचा मृत्यू झाला. इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तिघांनी मंत्रालयाच्या दारात येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण मुख्यमंत्री किंवा त्यांच्या सरकारच्या चेहऱ्यावरची सुरकुती हलली नाही. तिघांचीही वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक झाली, लुबाडणूक झाली असे त्यांचे म्हणणे आहे व त्यामुळेच त्यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला. पण जे सरकार फसवणुकीतून निर्माण झाले ते लोकांच्या फसवणुकीवर काय उतारा देणार?” असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page