“अधटरावांची राजकीय समज लक्षात येण्यासाठी नैतिक योग्यता आवश्यक.” – रूपेश कदम यांचे प्रत्युत्तर.

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | देवरुख | सप्टेंबर ०८, २०२३.

“भास्कर जाधव हे शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे” ही गोष्ट सर्वश्रुत आहे. याबाबत दुमत असण्याचे काहीच कारण नाही. शिवसेनेला डोळे दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या छावणीत जायला वाघाचे काळीज हवेच. मात्र पुढील काळात राष्ट्रवादीला तिलांजली देत शिवसेनेच्या अगदी पहिल्या फळीत स्थान मिळवणे हे ही एखाद्या पराक्रमासारखेच आहे. या सर्व गोष्टींमुळे शिवसेना (उबाठा) गटाचे नवनिर्वाचित तालुका प्रमुख, आमचे मित्र नंदादिप बोरुकर यांच्या मताशी मी सहमत आहे. मात्र आमदार जाधव साहेबांना खुश करण्यासाठी त्यांनी केलेले विधान हास्यास्पद आहे. अधटराव साहेब हे संगमेश्वर-चिपळूण विधानसभेचे निवडणूक प्रमुख म्हणून भाजपाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे पक्षीय भूमिका मांडण्याचा संपूर्ण अधिकार त्यांना आहे. यात वरिष्ठांना खूश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुळात भारतीय जनता पार्टीमध्ये खुशमस्कर्‍यांची संस्कृती नाही. पण ज्यांचा पक्ष केवळ याच कारणांमुळे आज शिल्लक आहे त्यांना हा फरक काही केल्या कळणार नाही असा चिमटा भारतीय जनता पार्टीचे युवा पदाधिकारी श्री. रूपेश कदम यांनी काढला आहे.

“अधटराव साहेब पक्ष बदलुन भाजप मध्ये आले आहेत हा इतिहास कोणी नाकारत नाही. पण आज ज्यांची भलावण करण्यासाठी सन्माननीय अधटराव साहेबांवर टीका करत आहेत त्या आमदार  भास्कर जाधव यांनी पक्ष बदलले नाहीत असे म्हणायचे आहे का? इतकेच कशाला, जरा एकदा आपल्या बॅनरचे अवलोकन करा. सर्व नेत्यांनी एक परिक्रमा पूर्ण केली आहे. म्हणून म्हणतो बोरुकर साहेब, जिनके घर शिशे के होते हैं वह दुसरों के घरों पर पत्थर नहीं फेंका करते.” असा टोला हाणतच रूपेश कदम पुढे म्हणाले, “सेना स्टाईल नेमकी कुणाची हे आधी आपसांत ठरवा आणि मग काय उत्तर द्यायचे ते द्या. प्रत्युत्तर तेवढ्याच समर्थपणे दिले जाईल.”

“राजकारणात कोणी सर्वगुणसंपन्न अथवा सर्वज्ञ नसतो. मात्र ही गोष्ट तुमच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वीकारली असती तर आज तुमची अशी दुर्दशा झाली नसती. भाजपाचे तालुक्यात असलेले वर्चस्व निवडणुकांमध्ये दाखवूच. तसे तुम्हीही आमचे हितचिंतक आहात याबाबत आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. बाकी केविलवाणी अवस्था झालेल्यांनी दुसऱ्यांच्या प्रयत्नांना हिणवणे काही पचनी पडत नाही.”

संगमेश्वर तालुक्यात भाजपा मोठा झाला तो निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या असिम त्यागामुळे. भाजपा मोठा झाला तो संघाच्या संस्कारांमुळे. भाजपा मोठा आहेच आणि त्याला अजून मोठे करणे हे आमचे दायित्त्व आहे. आशा करतो की कायम असाच विरोध करत रहाल. येणाऱ्या निवडणुका जरूर आरसा दाखवतील.” असेही ते पुढे म्हणाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page