ईडीपासून सुटका म्हणजे पुनर्जन्म, भुजबळांवरुन स्फोटक दावा; पुस्तकावर कारवाईचा इशारा…

Spread the love

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे विरोधकांच्या हातात आयती संधी मिळालीये. राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात त्यांनी हा मोठा दावा केला आहे. ज्यावर आता छगन भुजबळ यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

मुंबई- पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी पुस्तक लिहिलं आहे. ज्यात ईडीपासून सुटका करण्यासाठी भाजप सोबत गेल्याचं भुजबळ म्हणाले असा दावा करण्यात आलाय. ईडीपासून सुटका म्हणजे पुनर्जन्म झाल्याची भुजबळांची प्रतिक्रिया होती असं छापण्यात आलंय तर भुजबळांनी हे दावे फेटाळले आहेत. ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी अजित पवारांसोबत नेते भाजपसोबत गेले आणि ईडीपासून सुटका म्हणजे पुनर्जन्म आहे, असं भुजबळ म्हणाल्याचा दावा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी पुस्तकातून केलाय.

अर्थात हा, दावा भुजबळांनी फेटाळलाय आणि सरदेसाईंवर आणि त्यांच्या पुस्तकावर कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की, मे 2023 मधील ती संध्याकाळ होती. नाशिकच्या हॉटेलमध्ये वातानुकूलीत खोलीतही छगन भुजबळांना घाम फुटला होता. व्हिस्कीचे एक एक घूट घेतानाही त्यांच्या चेहरा चिंताग्रस्त वाटला. भुजबळ म्हणाले की, जेलमधील त्या दिवसांचा विचार करुन मला रात्री झोप येत नाही. मी आता 75 वर्षांचा आहे आणि अजूनही ईडी माझ्या मागे लागली आहे. राजदीप सरदेसाईंनी विचारलं की, पण तुम्ही एवढे ज्येष्ठ नेते आहात. मला खात्री आहे की शरद पवार तुम्हाला मदत करतील.

भुजबळ म्हणाले की, जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा आयुष्यात एकटे असता. मतलबी है सारी दुनिया. ईडीवरुन भुजबळ बोलले की,वो मुझे देशमुख की तरह फसाना चाहते है. भाजपसोबत हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही, ही सर्वांची भावना झाली. माझ्यासाठी ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच. ईडीपासून सुटका झाल्यानं अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या होत्या. मी जर उच्च जातीचा असतो तर माझ्यासोबत असे वागले नसते.

पुन्हा ईडीची नोटीस आली आणि जेलमध्ये जायचं नाही असं भुजबळ म्हणाल्याचं सरदेसाईंच्या पुस्तकात आहे. पण मला महाविकास आघाडीच्या काळातच कोर्टाकडून क्लीनचिट मिळाली. मग, पुन्हा कशी जेलची भीती असं प्रतिसवाल भुजबळांनी केला.

राजदीप सरदेसाईंच्या भुजबळांवरील पुस्तकातील दाव्यांवरुन आता विरोधकांना आयतं कोलित मिळालंय. स्वत: शरद पवारही त्यावर बोललेत. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात भुजबळांना जवळपास अडीच वर्षे जेलमध्ये राहावं लागलं. त्या काळात भुजबळांनी तब्येतही खालावली होती. मात्र पुन्हा नोटीस आली आणि भाजपसोबत गेल्यानं पुनर्जन्म वगैरेच्या प्रतिक्रिया भुजबळांनी दिल्याचा दावा, खळबळ उडवणारा आहे. अर्थात भुजबळांनी अशी आपण मुलाखत कोणाला दिलेली नाही म्हणत दावा फेटाळल आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page