रत्नागिरी, ११ डिसेंबर- महाराष्ट्रात सुप्रसिध्द असलेला संगमेश्वर तालुक्यातील श्री देवी निनावीचा शिंपणे उत्सव ज्याठिकाणी साजरा करण्यात येतो त्या सरकारी गावठाणन जमिनीवर अतिक्रमण करण्यात आल्याने भावना ग्रामस्थांच्या दुखावल्या आहेत. यातून समाजात
तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुमारे अडीचशे ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. मात्र कोणतीच कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. संगमेश्वर तालुक्यातील शिंपणे उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.
रत्नागिरीच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांसह अनेक ठिकाणांहून लाखो लोक या शिंपणे उत्सवात दरवर्षी सहभागी होत असतात. शिमगा उत्सव याठिकाणी श्री देवी निनावीच्या सहाणेवर पालखी बसवली जाते. होम व माड उभा केला जातो. माड उभा करण्यासाठी आजूबाजूची जागा मोकळी ठेवण्यात आली आहे. रस्त्याच्या बाजूने वीज वाहिनी जात असल्याने आतील बाजूला माड उभा केला जातो. यामध्ये संपूर्ण गावातील ग्रामस्थ सहभागी असतात. सर्व जातीचे, धर्माचे लोक एकत्र येवून हा सण साजरा करतात.मात्र दिवसांपूर्वी येथील सरकारी गावठाण जमिनीवर ऐतिहासिक वारसा असलेले ठिकाण खोदकाम करण्यात आले. हे खोदकाम सुमारे १० फुटांचे आहे. त्यानंतर याठिकाणी आरसीसी बांधकाम करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी या संदर्भात आधी ग्रामपंचायतीकडे व त्यानंतर तहसिलकार्यालयात जावून दाद मागितली.सरकारी जागेत आणि तेही ऐतिहासिक महत्व असलेल्या हिंदू व सर्वधर्मीयांचा सहभाग असलेल्या सोहळ्याच्या ठिकाणीहे काम कसे काय केले गेले त्यासाठी कोणी परवानगी दिली याचा जाब विचारण्यात आला. मात्र अशा प्रकारची परवानगीच दिली गेली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. हे बांधकाम रोखावे आणि त्वरीत काढून टाकावे अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. अशा प्रकारच्या बांधकामामुळे धार्मिक तेढ निर्माण होत आहे. ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडेही याबाबत तक्रार देण्यात आली होती. दरम्यान याबाबत कोणतीच कारवाई झाली. नाही तर ग्रामस्थ आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.